बेशिस्त वाहनचालकांना चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त वाहनचालकांना चाप
बेशिस्त वाहनचालकांना चाप

बेशिस्त वाहनचालकांना चाप

sakal_logo
By

नवीन पनवेल. ता. २९ (वार्ताहर) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३४० कोटी रुपये खर्च करून हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात येणार आहे. ही यंत्रणा अस्तित्वात येण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार असून यासाठी ९३ ठिकाणी ३७० सीसी टीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यामुळे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांसोबत ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे.
पुणे-मुंबई या दोन महामार्गांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीसोबत वाढत्या अपघातांमुळे प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्य सरकारने या मार्गावर एचटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून यासाठी पीपीपी तत्त्वावर यंत्रणा विकसित केली जात आहे. पहिली दहा वर्षे या व्यवस्थापनाची जबाबदारी ठेकेदाराकडे असणार आहे; तर त्यानंतर एमएसआरडीसीकडे ही जबाबदारी येणार आहे. यासाठी एकूण ३४० कोटींचा खर्च अपेक्षित असून यातील ४० कोटींचा खर्च एमएसआरडीसी करणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ दंड
हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शिवाय मार्गावर कोठे अपघात झाला अथवा वाहतूक कोंडी झाली, तर तत्काळ याची माहिती संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. अपघातानंतर नेमके लोकेशन माहिती मिळेल. त्यामुळे पोलिस व रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचून जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनावर तत्काळ चलन बनवले जाईल.

लोणावळा येथे कंट्रोल रूम
हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ३९ ठिकाणी वाहनांची गती मोजली जाईल. ३४ ठिकाणी लेन कटिंग शोधले जाईल. द्रुतगती मार्गाच्या सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या ठिकाणी मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वजन करणारी यंत्रणा असेल, १३० ठिकाणी वाहतुकीवर नजर ठेवण्यात येईल, ११ ठिकाणी हवामान निरीक्षण प्रणाली बसवण्यात येईल, या ठिकाणी चार मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन असणार आहेत. तसेच याचे लोणावळा येथे कमांड व कंट्रोल सेंटर असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94837 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..