उद्योजकांची दादागिरी आता चालू देणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजकांची दादागिरी आता चालू देणार नाही
उद्योजकांची दादागिरी आता चालू देणार नाही

उद्योजकांची दादागिरी आता चालू देणार नाही

sakal_logo
By

कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळालाच पाहिजे. यापुढे उद्योजकांची दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांना दिला; मात्र याबरोबर महाराष्ट्रात उद्योजक टिकला पाहिजे, यासाठीही पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. कर्जत येथील शेळके सभागृहात आयोजित केलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाडचे आमदार भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा महिला आघाडीच्या रेखा ठाकरे आदी उपस्थित होते.

उदय सामंत यांनी आपल्या भाषणात आदित्य व उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना उमेदवारी देताना शर्ती-अटी टाकून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, ते आमच्यावर टीका करतात, हे कितपत योग्य आहे, असा सवाल सामंत यांनी केला. भाजप - शिवसेनेची नैसर्गिक युती तोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर अनैसर्गिक युती केली, ते आम्हा निष्ठेच्या गोष्टी शिकवू पाहतात. अशा अनैसर्गिक युतीतून बाहेर पडण्यासाठी आणि बाळासाहेबांचे वंदनीय विचार पुढे नेण्यासाठीच आम्ही आमदारांनी उठाव केला, असेही सामंत म्हणाले.

आमच्या गाड्या फोडण्याच्या व आमच्यावर हल्ले करण्याच्या ते वल्गना करत आहेत. मात्र, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आम्हीही शिवसैनिक आहोत, आमच्यातही ताकद आहे, असा इशारा या वेळी उदय सामंत यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहे. पदभार हाती घेतल्या-घेतल्या त्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. याचबरोबर समाजातील सामान्यातील सामान्य घटकांनाही कसा न्याय मिळेल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून मोफत उपचार मिळवून देत असल्याची माहिती या वेळी उदय सामंत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94890 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..