अखेर गुळगुळीत रस्त्यांचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर गुळगुळीत रस्त्यांचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
अखेर गुळगुळीत रस्त्यांचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

अखेर गुळगुळीत रस्त्यांचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेला गुळगुळीत रस्त्यांचा उड्डाणपूलच अपघाताला निमंत्रण देत असल्याच्या ‘सकाळ’च्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. मखमली तलावापासून वंदना सिनेमापर्यंत, लालबहादूर शास्त्री मार्ग, चरई येथील उड्डाणपुलावरील रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर सुरक्षेसाठी हा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील नौपाडा, मखमली आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलावरील रस्ते गुळगुळीत केले. हे रस्ते पाहून कळवा पुलावरील रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी केल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले; पण पावसाळा सुरू होत नाही, तोच या गुळगुळीत रस्त्यांची ‘घसरगुंडी’ झाल्याचे दिसत आहे. जून महिन्यात नौपाडा उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याच्या काही घटना पहिल्यांदाच पुढे आल्या. याबाबत नौपाडा पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात तक्रार केली होती. मात्र नेमक्या किती दुचाकी घसरल्या, याची कोणतीही नोंद ना पोलिसांकडे, ना आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे होती. त्यामुळे कोणतीच कारवाई होत नव्हती. यासंदर्भात ‘सकाळ’ने १ ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

मखमली तलावापासून वंदना सिनेमापर्यंत, लालबहाद्दूर शास्त्री रोड, चरई, ठाणे (प.) येथे उड्डाणपुलावरील रस्ता वाहतुकीसाठी असुरक्षित असून वारंवार अपघात होत असल्याची माहिती नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर आपत्ती व्यवस्थापणाला दिली. हा रस्ता पाऊस पडल्याने निसरडा होऊन दुचाकी वाहनांचा अपघात वारंवार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नौपाडा पोलिस स्थानकातील पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात धोकापट्टी बांधून बंद करण्यात आला आहे.
-------------
उशिराने जाग
उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनातून ऑईल रस्त्यावर पडले, तर किरकोळ पाऊस पडल्यानंतर उड्डाणपुलावर हे ऑईल पाण्यासोबत पसरते. यामुळे वेगाने चालणाऱ्या दुचाकी घसरतात. दरम्यान या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या कारही हेलकावे घेत असल्याचा अनुभव कार चालकांना आलेला आहे. अखेर पोलिस उपनिरीक्षकांच्या सूचनेनुसार मखमली तलावपासून वंदना सिनेमापर्यंत, लालबहाद्दूर शास्त्री रोड, चरई हा उड्डाणपूल शनिवारी मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94896 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..