पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडणे गरजेचे
पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडणे गरजेचे

पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडणे गरजेचे

sakal_logo
By

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : ज्या मुलांना आपण मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देत राहिलो त्याच मुलांच्या हातात मोबाईल देण्याची वेळ कोरोना काळात आली. काळानुसार परिस्थिती बदलत असल्यामुळे आता शिक्षण पद्धतीतदेखील बदल होणे गरजेचे आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात आवश्यक ती स्वावलंबता कशी येईल, या अनुषंगाने आता अभ्यासक्रम ठरवणे गरजेचे झाले असल्‍याचे मत शिक्षण तज्‍ज्ञ अवेलो रॉय यांनी व्यक्त केले. बदलापूरच्या सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने विद्यार्थी आणि पालकांसाठी दोन दिवसीय विद्यार्थी-पालक परिषदेत ते बोलत होते.

बदलापूर पश्चिम परिसरातील सेंट अँथनी शाळेत विद्यार्थी-पालक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसिकतेमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी, शाळेच्या प्रमुख शीतल टेंबुलकर यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोलकाता येथून आवेलो रॉय आले होते. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीसोबतच, विद्यार्थ्यांनी फावल्‍या वेळेत आपल्या कलागुणांना वाव देऊन त्याच कलागुणांच्या जोरावर आर्थिक स्वावलंबता कशी मिळवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा योग्य वापर करून अनेक विद्यार्थी कशा पद्धतीने आर्थिक लाभ मिळवत आहेत याची उदाहरणे त्यांनी दिली.
दोन दिवस चाललेल्या या परिषदेत पालक आणि विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दरवर्षी अशा पद्धतीने पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी परिषद व्हावी, अशी अपेक्षा या वेळी पालकांकडून व्यक्त करण्‍यात आली.
मुलांच्‍या शिक्षणाबाबत नियोजन आवश्‍‍यक
पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून आलेले अमरेंद्र चितळे यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनी कशी वर्तणूक ठेवावी आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा कशा जाणून घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले. एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत असताना घरातील आई आणि वडील हे दोघेही कामाला जात असताना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कसे नियोजन करता येईल, याचीही माहिती त्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94921 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..