महामार्गाची संपर्क यंत्रणा कोलमडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गाची संपर्क यंत्रणा कोलमडली
महामार्गाची संपर्क यंत्रणा कोलमडली

महामार्गाची संपर्क यंत्रणा कोलमडली

sakal_logo
By

मनोर, ता. २९ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघात आणि आपत्कालीन प्रसंगात मदतीसाठी असलेली संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. यामुळे एखादा अपघात किंवा इतर दुर्घटना घडल्यास आपत्कालीन मदत वेळेवर पोहोचण्यास विलंब होत आहेत. यामुळे महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेला ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महामार्गावर अपघात, बचाव कार्य आणि अन्य कामांसाठी कॉल सेंटरचा १०३३ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता विविध ठिकाणी बोलावे लागत आहे. त्यानंतर कॉल सेंटरकडून संबंधित टोल नाक्यावर संपर्क जोडला जातो. टोल नाक्यावर मदतीसाठी अपेक्षा केली असताना रुग्णवाहिका अन्य ठिकाणी असल्याचे उत्तर मिळत असल्याने संपर्क यंत्रणा निष्फळ ठरल्याने दिसून येत आहे. तर महामार्गावर दर तीन किलोमीटर अंतरावर मदत आणि संपर्कासाठी बसवलेली स्वयंचलित संपर्क यंत्रे बंद स्थितीत आहेत.
महामार्गावरील मेंढवन खिंड आणि गुजरात मार्गिकेवरील उतारावरील उड्डाणपुल अपघात प्रवण क्षेत्र आहे. पण येथे आपत्कालीन संपर्क क्रमांकाचे फलक गायब झाल्याने चालकांना मदतीसाठी संपर्क करता येत नाही. सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून महामार्गाच्या दुतर्फा स्वयंचलित संपर्क यंत्रणा म्हणून एसओएस बॉक्स कार्यान्वित करण्यात आले होते. देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बंद आहे.
महामार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर संपर्क क्रमांकाचे फलक लावणे बंधनकारक असताना अपघात प्रवण क्षेत्र मेंढवन व चारोटी या सुमारे अठरा किलोमीटरच्या भागामध्ये फलकच गायब झाले आहेत. या फलकांची चोरी होत असल्याचे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे असताना याच भागातील अन्य माहिती फलक सुस्थितीत आहेत. तर या भागात गस्तीपथकाकडून गस्त घातली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आपत्कालीन संपर्क यंत्रणेच्या समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सूरज सिंग यांना संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
......
अनेक ठिकाणची यंत्रे गायब
अपघात प्रसंगी मदतीसाठी स्वयंचलित संपर्क यंत्राची एक कळ दाबल्यास मदत मागणाऱ्याचे लोकेशन मदत कक्षाला थेट पोहोचते. तेथून मदत पथकाला तातडीने संपर्क करून मदत आवश्यक लोकेशनवर पोचवण्याची सूचना देते. मदतीसाठी ही यंत्रणा प्रभावी आहे. पण महामार्गावर अनेक ठिकाणची यंत्रे गायब आहेत.

प्रतिक्रिया,
ठेकेदार आणि प्रशासनाला काम करायला लागू नये, यासाठी ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. तर तक्रारी केल्यानंतरही दाद दिली जात नसल्याने आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी कोणाला हाक द्यावी हेच समजत नाही.
- हरबन्स नन्नाडे, सदस्य, महामार्ग वाहतूक संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94927 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..