३१५ शिक्षकांचा जीव टांगणीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३१५ शिक्षकांचा जीव टांगणीला
३१५ शिक्षकांचा जीव टांगणीला

३१५ शिक्षकांचा जीव टांगणीला

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २९ (वार्ताहर)ः रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्याचा निर्णय झाला आहे. पण या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करणाऱ्या ३१५ शिक्षकांना सामावून घेण्याबाबत मनपा प्रशासनाची भूमिका स्पष्ट नसल्याने संबंधित शिक्षकांना इतर ठिकाणी सामावून घेण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर पडली आहे.
पनवेल महापालिकेमध्ये सिडको वसाहतीबरोबर आजूबाजूच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१६ साली स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या अखत्यारित रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा येतात. या शाळा अद्यापही झेडपीच्या अधिपत्याखाली सुरू आहेत. या शाळा पनवेल महापालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याबाबत प्रस्तावसुद्धा देण्यात आले होते; परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रशासन याबाबत सकारात्मक नसल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि सध्याचे गणेश देशमुख यांनी शाळा हस्तांतरित करून घेतल्या नाहीत. अशातच पनवेल महापालिका झाल्याने रायगड जिल्हा परिषदेला पूर्वी येथून येणारा महसूल बंद झाल्यामुळे या भागांतील शाळा महापालिकेने चालवाव्यात, अशा प्रकारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने दिला आहे. अखेर या शाळा महापालिकेत हस्तांतरित करून घेण्याचा ठराव महासभेत संमत करण्यात आला आहे. मात्र, या शाळा ताब्यात घेतल्यानंतर ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे काय होणार, असा प्रश्न अनुत्तरितच आहे.

महापालिकेवर आर्थिक बोजा वाढणार
शाळा हस्तांतरित करून घेतल्यानंतर महापालिकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे. शिक्षकांच्या पगारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचे पन्नास टक्केच राज्य सरकारकडून मिळत असल्याने बाकी भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार मनपा प्रशासनाला परवडणार नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेणे कठीण असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात जाहीरपणे भूमिका स्पष्ट झाली नसली तरी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आता शिक्षण विभागाला इतरत्र सामावून घ्यावे लागणार असल्याचे वास्तव समोर येत आहे.

नव्याने शिक्षक भरती केली जाणार?
महापालिकेकडे ५१ शाळा हस्तांतरित झाल्यानंतर प्रशासन नव्याने शिक्षक भरती करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ते शिक्षण सेवक असल्याने त्यांच्यावर वेतनापोटी होणारा खर्च कमी होईल. या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाचा शिक्षण विभाग नवीन शिक्षक शाळांमध्ये नियुक्त करू शकते. हा सर्व प्रक्रियेचा भाग असून याबाबत धोरणात्मक निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.
--------------------------
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही आमचे शिक्षक घेणार असल्याचे मंजूर झाल्याचे जिल्हा परिषदेने कळवले आहे. फेब्रुवारी २०२१ च्या महासभेमध्ये पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक जिल्हा परिषदेला वर्ग करून नवीन शिक्षण सेवक भरती करावी, असा ठराव झालेला आहे. ही मंजुरी महापालिकेकडे ५१ शाळा हस्तांतरित झाल्यानंतर प्रशासन नव्याने शिक्षक भरती करणार आहे.
-बाबासाहेब चिमणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94950 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..