मिरा-भाईंदरच्या नाट्यगृहाचे नाव बदलणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरच्या नाट्यगृहाचे नाव बदलणार ?
मिरा-भाईंदरच्या नाट्यगृहाचे नाव बदलणार ?

मिरा-भाईंदरच्या नाट्यगृहाचे नाव बदलणार ?

sakal_logo
By

भाईंदर, ता.२९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहा सप्टेंबरला लोकार्पण होत असलेल्या नाट्यगृहाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे नाव बदलून त्या जागी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहाचे नाव बदलण्यास तीव्र विरोध करणाऱ्या भाजपने आपल्या भूमिकेपासून घूमजाव करत नाव बदलण्यास पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने मात्र नावात बदल करण्यास ठाम विरोध केला आहे.
येत्या सहा सप्टेंबरला दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या नाट्यगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर या नाट्यगृहाला लता मंगेशकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. मात्र या मागणीला त्यावेळच्या सत्ताधारी भाजपने कडाडून विरोध केला होता. नाट्यगृहाला याआधीच दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला. कोणत्याही वास्तूला अथवा विकास कामाला देण्यात आलेले नाव बदलता येणार नाही, असा ठराव महासभेनेच मंजूर केला असल्यामुळे नाट्यगृहाचे नाव बदलता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यावेळी भाजपने घेतली होती.
मात्र राज्यात शिंदे गट व भाजप यांचे सरकार स्थापन होताच स्थानिक पातळीवर भाजपने आपल्या भूमिकेपासून घूमजाव केले आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या शेवटच्या महासभेत भाजपने स्वत:हूनच नाट्यगृहाच्या नावात बदल करण्याचा विषय उपस्थित केला. नाट्यगृहाला लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने सभागृहात ठेवला. त्याला शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. काँग्रेसने मात्र नाव बदलाला विरोध केला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी देशासाठी थोर कार्य केले आहे. लता मंगेशकर यादेखील तेवढेच मोठे व्यक्तिमत्त्व असल्या तरी कलाम यांच्यासारख्या महनीय व्यक्तीचे नाव बदलणे हा त्यांचा अवमान आहे, असे मत काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी मांडले. तर विषय पत्रिकेवर विषय नसताना नाट्यगृहाचे नाव बदलाच्या विषयावर चर्चा करणे बेकायदेशीर आहे व एकदा दिलेले नाव बदलता येणार नाही, असा महासभेचाच ठराव आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे नाव बदलता येणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी मांडली.
....
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
आता महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली असल्यामुळे आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे नाट्यगृहाच्या नावाबाबत आयुक्त काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94963 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..