बेघर झोपडीधारक आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघर झोपडीधारक आक्रमक
बेघर झोपडीधारक आक्रमक

बेघर झोपडीधारक आक्रमक

sakal_logo
By

वडाळा, ता. २९ (बातमीदार) ः वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील आनंद नगर परिसरात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या ४६४ झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत ओमकार रिअल्टर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीने हाती घेतले आहे. मात्र गेल्या १२ वर्षांत कोणत्याही प्रकारचा पुनर्विकास करण्यात न आल्याने साधारण २५० झोपडीधारक बेघर झाले आहेत. झोपडीधारकांना गेल्या पाच वर्षांत विकासकाने भाडे न दिल्याने येथील रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. शुक्रवारी या संतप्‍त रहिवाशांनी विकासकाच्या सायन येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. तसेच मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील यावेळी झोपडीधारकांनी दिला आहे.
२००९ साली सुरणा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने आनंदनगरमधील झोपड्यांचे सर्वेक्षण करून पुनर्विकास करण्याचे काम झोपडीधारकांना विश्वासात घेऊन हाती घेण्यात आले होते. तसेच येथील घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत इतर ठिकाणी स्थलांतरासाठी प्रत्येक झोपडीधारकास प्रतिमहा भाडे देण्यात येईल, असा करार देखील करण्यात आला होता. त्यानुसार ४६४ झोपडीधारकांपैकी साधारण २५० झोपडीधारकांनी इमारतीच्या बांधकामासाठी आपली राहती घरे खाली केली. मात्र गेल्या बारा वर्षांत येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. त्यात स्थलांतर झालेल्या झोपडीधारकांना गेल्या पाच वर्षांपासून प्रतिमहा भाडे मिळणे बंद झाल्याने या झोपडीधारकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाने झोपड्या खाली करण्याचे काम केले, मात्र आम्हा झोपडीधारकांना बेघर करून ठेवले असल्याचा आरोप झोपडीधारकांनी केला आहे.

माहिती अधिकाराचा वापर
झोपडीधारकांनी म्हाडा आणि महापालिका कार्यालयात या संदर्भात तक्रार केली. तसेच या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती आरटीआयच्या माध्यमातून मागवली असता हा प्रकल्प सुरणा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे नसून ओमकार रिअल्टर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीने ताब्यात घेतला असल्याचे वास्तव्य समोर आले आहे. झोपडीधारकांना तसेच आनंद नगर कॉ. ऑ. हौ. सोसायटीला विश्वासात न घेता विकासकाने केलेल्या अंतर्गत व्यवहारामुळे येथील झोपडीधारक नाराजी व्यक्त करीत असून या विरोधात झोपडीधारकांनी विकासकाच्या सायन येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध केला आहे.

या आहेत मागण्या
पुनर्विकासाला झोपडीधारकांचा विरोध नाही, मात्र हा विकास करताना विकासकाने झोपडीधारकांना विश्वासात घ्यावे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रतिमहा भाड्याचे धनादेश देण्यात यावेत. तसेच येथील इमारतीचे बांधकाम कारण्यात यावे व हक्काचे घर झोपडीधारकांना देण्यात यावे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94985 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..