सिडकोकडून २०८१ कोटींचे अभय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोकडून २०८१ कोटींचे अभय?
सिडकोकडून २०८१ कोटींचे अभय?

सिडकोकडून २०८१ कोटींचे अभय?

sakal_logo
By

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ः सीवूड्स येथील १६ हेक्टर जागेवर रेल्वेस्थानक उभारण्याच्या बदल्यात सिडकोने एल ॲण्ड टीला दिलेल्या भूखंडांची तब्बल दोन हजार ८१ कोटींची रक्कम थकवल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी सिडकोने एल ॲण्ड टीवर आकारलेला दंड, विलंब शुल्क आणि प्रकल्पाच्या फायली गायब झाल्याचेही उघड झाले. लोकलेखाधिकार समितीकडे सिडकोने दिलेल्या लेखी उत्तराची कागदपत्रे माहिती अधिकारात मागितली असता, ती कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती सिडकोने पुढे केली आहे.
२००८ ला सिडकोने सीवूड्स येथील १६ हेक्टर भूखंडावर रेल्वेस्थानक उभारण्यासोबत इंटीग्रेटेड संकुलाच्या विकासासाठी निविदा मागवल्या होत्या. ही निविदा एल ॲण्ड टी ने जिंकल्यानंतर एक हजार ८०९ कोटींची रक्कम निश्चित करण्यात आली. या रकमेपैकी एलॲण्डटीने सिडकोला ७२४ कोटी रुपये अदा करून एप्रिल २००८ मध्ये करार केला. उर्वरित एक हजार ८५ कोटी रुपये एप्रिल २००९, २०१० आणि २०११ अशा तीन हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार होते; परंतु एलॲण्डटीने दिलेल्या मुदतीत सिडकोला हप्ते भरले नाहीत. उलट २१ एप्रिल ते २४ जून असे वारंवार पुढे ढकलत गेले. हप्ता भरण्यास विलंब झाल्यामुळे एलॲण्डटी कंपनीला सिडकोने नियमानुसार १४.२५ टक्के प्रतिवर्ष या दराने व्याज आकारायला हवा होता. प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी कराराच्या तारखेपासून, रेल्वेस्थानकासाठी तीन वर्षे आणि व्यावसायिक सुविधा बांधण्यास परवानगी दिलेल्या क्षेत्राच्या ५० टक्के जागेसाठी पाच वर्षे होता. करारनाम्यानुसार एलॲण्डटीने जनरल अरेंजमेंट ड्रॉईंगसाठीची मान्यता रेल्वे प्रशासनाकडून मिळवायची होती; परंतु विकसकाने ही मान्यता ऑगस्ट २०११ मध्ये मिळवली. करार झाल्यापासून तीन वर्षे उलटल्यानंतर ही मान्यता मिळवण्यात आली. सप्टेंबर २०११ पर्यंत एलॲण्डटीने इमारतीची एक वीटही रचली नाही. तरीसुद्धा सिडकोने एलॲण्डटीला हप्ता भरण्यास मुदतवाढ, विलंब शुल्क, तीन वर्षांची मुदतवाढ, विलंब शुल्क १४.२५ टक्क्यांहून कमी करून ९ टक्के करणे, रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वाणिज्य संकुलाच्या विकासासाठी दोन वर्षांची मुदतवाढ अशी विनंती एलॲण्डटीने सिडकोला केली होती. सिडको महामंडळाने राज्य सरकारची परवानगी न घेता थेट सर्व मागण्या मान्य केल्या.
सिडकोच्या या मान्यतेमुळे एलॲण्डटीला ४६४ कोटी २७ लाख रुपये इतक्या रकमेचा थेट फायदा आणि सिडकोचे नुकसान झाल्याचा ठपका महालेखा परीक्षकांच्या लोकलेखा समितीने ठेवला. त्यानुसार जुलै २०११ ला सिडकोने तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला; परंतु मंत्रालयात लागलेल्या आगीत फायली जळाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसमोर १८ एप्रिल २०१७ ला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व इतर अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली. यात राज्य सरकारने नेमलेल्या तीन जणांच्या चौकशी समितीने किती पैसे भरायचे, किती दंड आकारायचा याबाबतचे प्रस्ताव तयार केला आहे; परंतु त्याला सरकारची मंजुरी २०११ पासून प्रलंबित आहे. अखेर २०१६ ला हा प्रस्ताव पुन्हा सरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत एलॲण्डटीने पैसे भरले नसल्याची कागदपत्रे सिडकोकडे उपलब्ध नाहीत.
एलॲण्डटीने सिडकोला अद्याप पैसे भरलेले नाहीत. तसेच अलीकडे काही पैसे भरले असल्यास त्यांची चौकशी करून माहिती देता येईल, अशी माहिती सिडकोचे लेखावित्त अधिकारी मेनन यांनी दिली.
...
२०११ पासून २०२२ पर्यंत सिडकोने एलॲण्डटी कंपनीकडून पैसे वसूल केलेले नाहीत. १४.२५ टक्क्यांनुसार हे पैसे सुमारे दोन हजार ८१ कोटींपर्यंत गेले आहेत. आरटीआय अंतर्गत मागितलेली कागदपत्रेही सिडकोकडे उपलब्ध नाहीत. याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- राजीव मिश्रा, माहिती अधिकार कार्यकर्ते
...
सिडकोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सिडकोने रेल्वेस्थानक आणि वाणिज्य संकुलाकरिता १६ हेक्टर जागा एलॲण्डटीला दिली होती. या कंपनीला वारंवार नियमबाह्य मुदतवाढ आणि विलंब शुल्कावर सवलत दिल्यानंतरही सिडकोला कंपनीने हप्त्याचे पैसे भरले नाहीत. तरीसुद्धा सिडकोने वाणिज्य संकुलाला बांधकाम प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्रे दिले कसे? तसेच हा भूखंड वाणिज्य वापराचा होता. आता त्या भूखंडावर सिडकोने निवासी वापराची पारवनगी दिली कशी? त्यामुळे आता त्या जागेवर
एलॲण्डटी सुमारे ३२०० घरांची कमर्शिअल निवासी इमारत उभारत आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95040 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..