गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची घट
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची घट

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची घट

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. २९ (पीटीआय) ः अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरवाढ चालूच राहण्याचे संकेत दिल्याने जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारातही जाणवले. विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स ८६१ अंशांनी, तर निफ्टी २४६ अंशांनी गडगडला. दिवसअखेर सेन्सेक्स ५७,९७२ अंशांवर, तर निफ्टी १७,३१२ वर स्थिरावला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.३९ लाख कोटी रुपयांची घट झाली.

शुक्रवारी अमेरिकी फेडरलच्या अध्यक्षांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढ सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. तसेच रुपयातील घसरण आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे आज आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात नकारात्मक वातावरण होते. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने बाजार सुरू होताच सेन्सेक्स जवळपास १५०० अंशांनी कोसळला. मुंबई शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान, बँकिंग शेअरची जोरदार विक्री झाली. कंपन्यांचे बाजार भांडवल घसरून २,७४,५६,३३० कोटी झाले.

दरम्यान, आज रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले उत्तराधिकारी जाहीर केले. तसेच फाईव्ह-जीसाठी दोन लाख कोटी रुपयांची, तर पेट्रोकेमिकलसाठी पुढील पाच वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले.

टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे शेअर घसरले; तर मारुती, एशियन पेंट्स, नेस्ले, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर वधारले.

अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिंता
---------------------------------------------
अमेरिकेतील दर वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिंता वाढल्याने बाजारात येत्या सत्रातही अधिक अस्थिरता दिसण्याची अपेक्षा असल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95043 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..