पान ३ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ पट्टा
पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

sakal_logo
By

शून्य कचरा व्यवस्थापनाचे धडे
नेरूळ (बातमीदार) ः रयत शिक्षण संस्थेचे वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील राष्ट्रसेवा योजना, पर्यावरण दक्षता समिती, भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये शंभर स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच शेकडो नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व चेअरमन डॉ. अल्, व्ही. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
जेएनपीटी बंदरात स्वच्छता अभियान
उरण (वार्ताहर) ः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीटी बंदरात केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र ’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम करण्यात आले. यावेळी पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अभियान करण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून घरातील कचरा घरातच वेगळा करणे आणि त्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले. सागरी किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ स्वयंसेवकांसह ७५ समुद्रकिनाऱ्यांवर ही मोहीम राबविणार आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एफ. जी. नाईक महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा
तुर्भे (बातमीदार) : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण संस्थेच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान पावसाळी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून रा. फ नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, उपमुख्याध्यापक नरेंद्र म्हात्रे, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे विद्यार्थी भविष्यात जातील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली गेली.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
जुईनगर परिसरामध्ये दिव्यांचा लखलखाट
जुईनगर (बातमीदार) ः परिसरामध्ये अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याचे अंधार पसरला होता. त्यामुळे फेरफटका मारायला येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच चिंचोली तलाव आणि सेक्टर २४ येथील सार्वजनिक उद्यानामध्ये गर्दुल्यांचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे जुईनगरमध्ये हायमास्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून चिंचोली तलाव आणि सेक्टर २४ मधील सार्वजनिक उद्यानामध्ये हायमास्ट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे जुईनगरमधील हा परिसर प्रकाशमय झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
----------------------------------------------------------
दिघ्यात अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी
वाशी (बातमीदार) ः अखिल भारतीय मातंग संघ बहुजन आघाडी माध्यमातून भोलानगर, अनंत, ईश्वर नगर, गणपती पाडा, साठेनगर, रामनगर, दिघासह ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्याच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोला नगर ते मुकुंद कंपनी रथातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक आणि संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते माजी खासदार संजीव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
-----------------------------------------------------
प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान
नवीन पनवेल (वार्ताहर) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली वर्षे सातत्त्याने विविध समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम पनवेल परिसरात राबवित आहे. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हे पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान राबवित आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या उपक्रमात महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत पत्रके आणि भित्तीपत्रके प्रदर्शित करून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, क्लबचे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सेक्रेटरी अनिल ठकेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर ऋषिकेश बुवा आदी उपस्थित होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
विविध कामांचे लोकार्पण
नवीन पनवेल (वार्ताहर) ः ताम्हाणे बंगला ते शाह प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतच्या गटारांचे व संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात २० लाख १९ हजार २४२ रुपयांची कामे पनवेल महापालिकेने केली आहेत. या कामांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या डिजिटल आरती संग्रहाचेही लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला पनवेल शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95073 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..