‘साले’ गाव कोकणातील गणेशोत्सवाला अपवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साले’ गाव कोकणातील गणेशोत्सवाला अपवाद
‘साले’ गाव कोकणातील गणेशोत्सवाला अपवाद

‘साले’ गाव कोकणातील गणेशोत्सवाला अपवाद

sakal_logo
By

पनवेल, ता. ३० (नितिन देशमुख) : गणेशोत्सव म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो कोकणातील घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव. कोकणातील चाकरमानी जगात कुठेही असला, तरी गणेशोत्सवासाठी कोकणात येतो. प्रत्येक घरा-घरात गणपती, हे कोकणचे वैशिष्ट्य. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साले हे गाव याला अपवाद आहे. या गावात कोणाच्याही घरी गणपती येत नाही, तरीही सगळे चाकरमानी सहकुटुंब त्या दिवशी गावात येतात. त्यामुळेच संपूर्ण कोकणात या गावाचे वेगळेपण दिसून येते.

कोकणात प्रत्येक लहान-मोठ्या गावात, वाडीत प्रत्येकाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते; पण माणगावपासून चार किमी आणि मुंबई-गोवा महामार्गापासून एक ते दीड किमी अंतरावर असलेले साले गाव मात्र याला अपवाद आहे. कुणबी समाजाची वस्ती असलेल्या या गावाची भोनकरांचे गाव म्हणून ओळख आहे. या गावातील चाकरमानी कोठे ही असला, तरी गणेशोत्साठी गावी येतो. गणेश चतुर्थीच्या सर्व गावकरी गावातील तलावाच्या कातळावर असलेल्या गणेश मंदिरात जमतात. तेथील गणेशमूर्तीची पूजा करतात. त्यानंतर सजवलेल्या पालखीत देवाला ठेवले जाते. तरुण पालखी खांद्यावर घेऊन शंखनाद करीत तलावात उतरतात. तलावातील पाण्यातून पालखी ३०० मीटरवरील पलीकडच्या तीरावर आणली जाते. या वेळी तलावात कितीही पाणी असले, तरी पाणी फक्त पालखीच्या खुराना लागते त्यापेक्षा पाणी वाढत नाही, असे वयस्कर माणसे सांगतात. पालखी पलीकडच्या तीरावर आल्यावर गावातील पालखी प्रत्येकाच्या घराच्या दारात नेली जाते. तेथे देवाची पूजा करून नैवेद्य दाखवतात. त्यानंतर वाजत-गाजत पालखी संपूर्ण गावात फिरून पुन्हा मंदिरात येते.

घरी गणपती आणल्यास अरिष्ट येते असा समज
----------------------------------------------
साले गावात आपल्या घरात कोणी गणपती आणल्यास त्याच्यावर अरिष्ट येते; मग ती व्यक्ती बाहेरून गावात राहण्यास आली असली, तरी तिने गावात गणपती आणला, तर त्याच्यावर अरिष्ट येते, असा अनुभव गावातील ज्येष्ठ माणसे सांगतात. त्यामुळे या गावाच्या हद्दीत कोणी गणपती आणीत नाही. येथील गणपती नवसाला पावतो, अशी गावातील नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला नवस फेडण्यासाठी येथे मोठी गर्दी असते. मुंबई-पुणे येथून मोठ्या प्रमाणात येथे भक्त येतात. एक गाव - एक गणपती ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्यास सुरुवात होण्यापूर्वीपासून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ‘साले’ या गावात अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95088 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..