घरगुती गणेशमूर्तीमध्ये यंदा वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गणेशमूर्तीमध्ये यंदा वाढ
घरगुती गणेशमूर्तीमध्ये यंदा वाढ

घरगुती गणेशमूर्तीमध्ये यंदा वाढ

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : कोरोनाचा दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव धूमधडाक्याने साजरा केला जात आहे. परिणामी यंदा घरगुती गणेशाच्या संख्येतही वाढ झाली आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मिरा भाईंदर व वसई विरार या दोन शहरात यावर्षी ४८,०१० घरगुती गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. गेल्या वर्षी घरगुती गणपतींची संख्या दोन्ही शहरात मिळून ४६,३१५ इतकी होती.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्वच सणांवर निर्बंध आले होते; मात्र यावर्षी गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्याचे आवाहन खुद्द सरकारनेच केले असल्यामुळे यंदा गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवात लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे. यावर्षी मिरा भाईंदर व वसई विरारमध्ये एकंदर १२१९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जाणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १२७३ इतकी होती. यावर्षी गौरींचे आगमनही मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाणार आहे. दोन्ही शहरात मिळून एकंदर १७९० गौरींच्या मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.

दीड दिवसांच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
बुधवारी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे गुरुवारी विसर्जन होणार आहे. मिरा भाईंदर महापालिकेने विसर्जनाची चोख तयारी केली आहे. मिरा भाईंदर शहरातील बावीस नैसर्गिक तलाव, तीन कृत्रिम तलाव तसेच खाडीकिनारी गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. याव्यतिरिक्त २४ स्वीकृती केंद्रात गणेशमूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडून स्वीकारल्या जाणार आहेत. महापालिकेने प्रत्येक तलावात मूर्ती विसर्जनासाठी एक तराफा तसेच खाड्यांमध्ये एकूण वीस बोटी तैनात केल्या आहेत. या प्रत्येक ठिकाणी महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवले
गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शहरातील बहुतांश ठिकाणचे खड्डे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95134 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..