मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा मार्ग बदलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा मार्ग बदलला
मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा मार्ग बदलला

मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा मार्ग बदलला

sakal_logo
By

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या जेसल पार्क येथील मलनिस्सारण केंद्रातून बाहेर खाडीत पडणाऱ्या सांडपाण्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. या केंद्रात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते खाडीत सोडले जात आहे आणि याच ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सांडपाण्याचा बाहेर पडण्याचा मार्ग विसर्जनाच्या ठिकाणाहून सुमारे सातशे मीटर दूर नेला आहे.
जेसल पार्क येथील मलनिस्सारण केंद्रावरून मोठाच वाद निर्माण झाला होता. या केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा ठप्प असल्यामुळे केंद्रात येणारे मलमूत्र प्रक्रियेविनाच खाडीत सोडण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला होता. ज्या ठिकाणी सांडपाणी खाडीत सोडले जाते त्याचठिकाणी दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाल करून सांडपाणी बाहेर पडण्याचा मार्ग बदलला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जेसल पार्क गृहसंकुल बांधणाऱ्या विकसकाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र १९८५ मध्ये बांधले. त्यातील यंत्रणा कालबाह्य झाली आहे. त्या केंद्रात केवळ प्राथमिक प्रक्रिया करून व क्लोरिनची मात्रा देऊन पाणी खाडीत सोडले जाते. या केंद्रात येणाऱ्या सांडपाण्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी हे मलनिस्सारण केंद्र नवघर येथील महापालिकेने बांधलेल्या नव्या मलनिस्सारण केंद्राला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र मधल्या भागातील सुमारे दोनशे मीटर लांबीची मलवाहिनी टाकण्याचे काम कांदळवन असल्यामुळे थांबले आहे. कांदळवन समितीने परिसराची नुकतीच पाहणी केली असून या विभागाची परवानगी लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. ही दोन्ही केंद्र एकमेकाला जोडली गेली की जेसल पार्क मलनिस्सारण केंद्रात येणारे सांडपाणी नवघर केंद्रात जाईल व त्याठिकाणी आधुनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते खाडीत सोडण्यात येणार आहे.
.....
मार्ग सातशे मीटर दूर
महापालिकेने जेसल पार्क केंद्रातून बाहेर खाडीत जाणाऱ्या सांडपाण्याचा सध्याचा मार्ग बंद केला आहे. या केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यापर्यंत एक नवी मलवाहिनी टाकण्यात आली आहे आणि सर्व सांडपाणी नाल्यात सोडले जात आहे. त्यामुळे आता सांडपाणी खाडीत जाण्याचा मार्ग गणेश विसर्जनाच्या जागेपासून सातशे मीटर दूर झाला आहे, अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
जेसल पार्क खाडीकिनारी गणेश विसर्जन घाट असला तरी त्याठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्ती बोटीने सुमारे एक ते दीड किलोमीटर आत खाडीत नेऊन विसर्जित केल्या जातात. त्यामुळे मलमूत्र खाडीत ज्याठिकाणी मिसळते त्याठिकाणी गणेश विसर्जन केले जाते असे म्हणणे चुकीचे आहे, असा खुलासाही महापालिका प्रशासनाने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95303 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..