गिर्यारोहणाच्या छंदातून कर्तृत्वाचा ठसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिर्यारोहणाच्या छंदातून कर्तृत्वाचा ठसा
गिर्यारोहणाच्या छंदातून कर्तृत्वाचा ठसा

गिर्यारोहणाच्या छंदातून कर्तृत्वाचा ठसा

sakal_logo
By

ऑन डयुटीसाठी ः


विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः दैनंदिन जीवनात सतत कामाचा व्याप असताना अनेक जण छंद जोपासतात. त्यापैकीच कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलिस शिपाई तुषार पवार याने गिर्यारोहणाचा छंद जोपासत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ गावातील पोलिस नाईक तुषार पवार २०१७ मध्ये झालेल्या भरतीदरम्यान नवी मुंबई पोलिस दलात दाखल झाले. तुषार पवार यांना लहानपणापासूनच निसर्ग, डोंगरदऱ्या भटकण्याची आवड होती, त्यामुळे पोलिस दलात दाखल झाल्यानंतर वेळात वेळ काढून गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे. सुरुवातीला पवार यांनी हिमालयातील साहसी गिर्यारोहणात सहभाग घेतला. याचदरम्यान परदेशात गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांच्या संपर्कात आल्यानंतर २६ जानेवारी २०१९ मध्ये आफ्रिकेचे सर्वोच्च किलिमांजारो शिखर (५,८९५ मीटर) सर केले. त्यानंतर त्याच वर्षी १५ ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च एल्ब्रुस शिखर (५६४२ मीटर) देखील सर केले. विशेष म्हणजे, हे दोन्ही शिखर महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून सर केले आहेत. तसेच या उंच शिखरांवर प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिन साजरा करणारा पहिला भारतीय पोलिसदेखील ठरला आहे.

विविध विक्रमांना गवसणी
तुषार पवार यांनी भारतीय हिमालयातील भागीरथी (६५१२ मीटर) या शिखरांवरही यशस्वी चढाई केली आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना तुषार पवार यांनी २६ मे रोजी वसुंधरा मोहिमेअंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प (५३६४ मीटर) वर राष्ट्रगीत गात १७५ फूट तिरंगा, भगवा तसेच महाराष्ट्र पोलिस ध्वज फडकवला आहे. त्यानंतर त्यांनी २७ मे रोजी खुंबू रिजनमधील काला पत्थर (५६४४ मीटर) शिखरावर गोरखशेपपासून ४ तासांत चढाई व उतराई पूर्ण केली आहे. तसेच जगातील सर्वात उंचीवर होणाऱ्या तेनझिंग हिलेरी एव्हरेस्ट मॅरेथॉन (२१ कि.मी.) मध्ये देखील सहभाग घेतला आहे. त्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व हायरेंज बुक ऑफ रेकॉर्ड बुकला देखील पवार यांची दखल घ्यावी लागली.
------------------------------------------------------------
भविष्यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट व यांसारख्या अष्टहजारी शिखरे सर करण्याचा, तसेच गिर्यारोहण या साहसी खेळामध्ये महाराष्ट्राचे व भारताचे नाव उंचावण्याचा मानस आहे. मात्र, यासाठी होणारा आर्थिक खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने मदतीची गरज आहे.
- तुषार पवार, पोलिस शिपाई, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95454 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..