३५ फुटी विनायकी देवीच्या अवतारात साकारला बाप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३५ फुटी विनायकी देवीच्या अवतारात साकारला बाप्पा
३५ फुटी विनायकी देवीच्या अवतारात साकारला बाप्पा

३५ फुटी विनायकी देवीच्या अवतारात साकारला बाप्पा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : यंदा गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा खेतवाडी गणेशोत्सव मंडळाची यंदाची मूर्ती भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. ‘खेतवाडीचा महागणपती’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेतवाडी आठवी गल्ली सार्वजनिक मंडळाने यंदा ३५ फुटी विनायकी देवीच्या रूपात बाप्पा साकारला आहे. हिरव्या बांगड्या, गजरा, दागिने आणि नऊवारी साडी अशा पारंपरिक पेहरावात असलेली स्त्रीरूपी मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मूर्तीच्या हातात त्रिशूल असून स्त्री-सक्षमीकरणावर भर देत मंडळाने यंदा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

मंडळाचे सचिव नीलेश शिरधनकर म्हणाले, ‘यंदा आम्ही ५९ वे वर्ष साजरे करत आहोत. उत्सवाचा उत्साह अधिक मोठा करण्याच्या उद्देशाने आणि महिला सक्षमीकरणाची थीम घेऊन आम्ही विनायकी देवीची मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. विनायकी देवी विघ्नेश्वरी, स्त्री गणेश, गणेशनी इत्यादींसह इतर नावांनी ओळखली जाते. बरेच जण असे मानतात, की ती भगवान गणेशाची स्त्री किंवा शक्ती अशी स्वरूपे आहेत. आम्हाला स्त्रीचे सौंदर्य, सामर्थ्य, सर्जनशीलता आणि तिचे जीवनातील महत्त्व आम्हाला मूर्तीतून अधोरेखित करायचे होते.’

मंडळाने आपल्या सजावटीमध्ये द्रौपदी मुर्मू, सिंधुताई सपकाळ, मिताली राज, कल्पना चावला, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी इत्यादींसारख्या प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान महिला व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रेही लावली आहेत. त्याशिवाय विनायकी देवीची कथा सांगणारी एक व्हिडीओ क्लिपही भक्तांना दाखवली जात आहे. गणपतीला स्त्रीरूप का घ्यावे लागले, याची आख्यायिका त्याद्वारे सांगितली जात आहे. मंडळाने बाजीराव, हनुमान आणि विठ्ठलाची प्रतिकृतीही मंडपात बसवली आहे.

अशी आहे आख्यायिका
मंडळ एका लाईट शोच्या माध्यमातून देवीच्या पौराणिक कथांचे वर्णन सांगत आहे. ध्वनिफितीच्या मदतीने भारतातील काही प्रसिद्ध महिलांच्या संघर्षावर प्रकाश टाकला जात आहे. पार्वतीमातेला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या गणेशाला स्त्रीरूप घ्यावे लागले होते. त्याबाबतची आख्यायिका अनेकांना माहिती नाही. गणपतीने कधी नारीरूप धारण केले होते, याचीही कल्पना अनेकांना नाही. त्यामुळे आम्ही यंदा अशा प्रकारे नारी रूपातील बाप्पा साकारला, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95631 Txt Raigad Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..