विकासाचा भस्मासुर मुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासाचा भस्मासुर मुळावर
विकासाचा भस्मासुर मुळावर

विकासाचा भस्मासुर मुळावर

sakal_logo
By

सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ ः महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील नियोजनामध्ये कांदळवने आणि पायाभूत सुविधांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात घटले आहे. मोकळ्या जागांची मालकी महापालिकेपेक्षा सिडकोकडे ज्यादा असल्याने नव्या प्रकल्पांमुळे लोकसंख्येत कमालीची भर पडणार आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या जागा कमी असल्याने शहरातील लोकसंख्येला रस्ते, गटारे, पदपथ, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या अशा सुविधा पुरवताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शहरातील होणारे भविष्यातील नवे प्रकल्प नवी मुंबईला गिळंकृत करणारे ठरणार आहेत.
स्वतःचा विकास आराखडा नसल्याने गेली ३२ वर्षे नवी मुंबई महापालिका सिडकोच्या विकास आराखड्यानुसार कारभार चालवत होती. त्यामुळे प्रत्येक वेळी महापालिकेला सिडकोचा ‘ना हरकत दाखला’ घ्यावा लागत होता. त्यामुळे शहराच्या विस्ताराचे वेध लागलेल्या महापालिकेने आता स्वतःचा विकास आराखडा जाहीर केला आहे. या विकास आराखड्यानुसार नवी मुंबईची लोकसंख्या भविष्यात ३५ ते ४० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच पालिकेने वाहनतळ, खेळाची मैदाने, वैद्यकीय सुविधांच्या इमारती, शैक्षणिक आणि इतर नागरी सुविधांकरीता आवश्यक जागा अपुऱ्या असल्याचे नमूद केले आहे. या सर्व जागांसाठी पालिका सिडकोवर अवलंबून आहे. पण सिडकोने मात्र भूखंड विक्रीचा सपाटा लावल्याने महापालिकेला हवे असलेले भूखंडच मिळाले नाहीत, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवताना महापालिकेची दमछाक होणार आहे.
--------------------------------------------------------
सिडकोकडे ५९७ हेक्टरचे भूखंड
स्थानिक भाजीवाले, फेरीवाले, मासे विक्रेत्यांसाठी मार्केट आदी भूखंड अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेले नाहीत. जुन्या विकास आराखड्यात शहराभोवती कांदळवनांची संख्या १४५९ हेक्टर एवढी आहे, तर महापालिकेच्या आराखड्यात हेच प्रमाण ५५८ हेक्टर एवढे झाले आहे. महापालिकेला सिडकोकडून ४८१ हेक्टर इतक्या जागेचे भूखंड हवे आहेत; तर सिडकोकडे ५९७ हेक्टर जागेचे भूखंड महापालिका हद्दीत शिल्लक आहेत.
-----------------------------------------
प्रतिव्यक्ती मैदानाचे प्रमाण बिघडले
शहर विकास आराखड्याच्या नियोजनाच्या निकषांनुसार १० ते १२ चौरस मीटर प्रतिव्यक्ती मोकळी जागा उद्यान व खेळाचे मैदान स्वरूपात असायला हवी, सिडकोच्या नियोजनानुसार हा दर किमान ३ चौरस मीटर प्रतिव्यक्ती इतका आहे; परंतु नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात उद्यानांचे प्रमाण प्रतिव्यक्ती १.३४ चौरस मीटर इतके आहे. खेळाचे मैदान ०.३९ चौरस मीटर इतके आहे.
----------------------------------
ढोबळ अभ्यास करून हा विकास आराखडा नागरिकांच्या भल्याचा असल्याचे चित्र उभे केले जात आहे. मात्र, हा आराखडा बिल्डर धार्जिणा असून नागरी सुविधांचा ताण कमी करण्याऐवजी वाढवणारा आहे. या आराखड्यामुळे नवी मुंबईकरांचे जीवन असह्य होणार असल्याने नव्या प्रकल्पांना ठाम विरोध आहे.
-नीलेश पाटील, अध्यक्ष, आगरी-कोळी युथ फाऊंडेशन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95640 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..