गणेशोत्सवातील देखाव्यातून वाचन संस्कृतीचा प्रसार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवातील देखाव्यातून वाचन संस्कृतीचा प्रसार!
गणेशोत्सवातील देखाव्यातून वाचन संस्कृतीचा प्रसार!

गणेशोत्सवातील देखाव्यातून वाचन संस्कृतीचा प्रसार!

sakal_logo
By

वडाळा, ता. ४ (बातमीदार) ः विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा मिळावी यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एम. भट हायस्कूलमधील कलाशिक्षक अमित परब दरवर्षी प्रयत्नशील असतात. यंदाही त्यांनी परळमधील शाळेच्या सभागृहात ‘घरोघरी ग्रंथालय’ अशा आशयाची परिपूर्ण सजावट केली आहे. ग्रंथांचे महत्त्व आणि वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या सजावटीतून केला आहे. सजावटीतून स्फूर्ती घेऊन काही विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनालाही सुरुवात केली आहे. काही विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाचन संस्कृती टिकावी म्हणून विविध स्तरावर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता अमित परब यांच्या कल्पनेतून ‘घरोघरी ग्रंथालय’चा देखावा शाळेच्या सभागृहात साकारण्यात आला आहे. शाळेचे प्राचार्य के. एस. महाले, उपप्राचार्य ए. जे. गावड, पर्यवेक्षिका एम. आर. राव व इतर शिक्षक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. कोणत्या लेखकांची पुस्तके वाचायची, याचा फलकही देखाव्यात लावण्यात आला आहे. त्यात बालसाहित्यांचाही समावेश आहे. काही लेखकांची आणि त्यांच्या पुस्तकांची नावेही लिहिण्यात आली आहेत.

सजावटीसाठी शाळेचे माजी शिक्षक डिमेलो व माजी विद्यार्थिनी मेधा अलकारी यांनी लिहिलेली पुस्तके दर्शनी भागात ठेवण्यात आली आहेत. सजावटीतून स्फूर्ती घेऊन काही विद्यार्थ्यांनी पुस्तकवाचनाला सुरुवात केली आहे. काही विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून किंवा वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून पुस्तक देणे सुरू केले आहे. संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी माजी विद्यार्थी मयूर सुपेकर, उन्नती सकपाळ, सिद्धेश डाफले, ज्योती काटकर, केतन कदम, संतोष पोटले आदींचे विशेष सहकार्य लाभले.

वाचाल तर वाचाल!
आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तक वाचन मागेच पडत चालले आहे. विद्यार्थी तर ग्रंथालयात जाणेच विसरले आहेत. त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘घरोघरी ग्रंथालय’ची संकल्पना पुढे आली. तोच आशय घेत गणेशमूर्तीच्या आजूबाजूला परिपूर्ण सजावट केली आहे. गणेशदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा परिचय व्हावा म्हणून ती दर्शनी भागात ठेवण्यात आली आहेत. रंगीबेरंगी मुखपृष्ठ पाहून त्यांनाही पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळावी, असा सजावटीमागील हेतू आहेत. त्यातून आपला विकास साधतील. वाचाल तर वाचाल, असा मंत्र विद्यार्थ्यांवर बिंबवण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95644 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..