राष्ट्रवादीविरोधात मुख्यमंत्री पुत्र मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीविरोधात मुख्यमंत्री पुत्र मैदानात
राष्ट्रवादीविरोधात मुख्यमंत्री पुत्र मैदानात

राष्ट्रवादीविरोधात मुख्यमंत्री पुत्र मैदानात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ ः दसरा मेळावा कोण घेणार, यावर ठाकरे आणि शिंदे गटांत रस्सीखेच सुरू आहे. त्यात जनता कुणाच्या मागे आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्याला ट्विट करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे. हा शो नाही, पहाटेच्या फ्लॉप शोसारखा, हा ‘शो’ले आहे, अशी शाब्दिक कोटी करत शिंदे यांनी पवारांवर टीका केली. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर येते, हे पाहावे लागेल.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यावर टिप्पणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच मैदानात उतरावे लागले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते उत्तर देण्यात कमी पडत असल्यामुळे किंवा त्यांना कुणी गांभीर्याने घेत नसल्यामुळे खासदार डॉ. शिंदे यांनाच ट्विट करून उत्तर द्यावे लागले असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतून बंड केल्यापासून ते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक आघाड्यांवर त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धुरा सांभळण्याचा प्रयत्न केला आहे. पडद्यामागे राहून शिंदे गटामध्ये येण्यासाठी अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची जुळवाजुळवही त्यांनी केली. युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे यांनीही ठाकरे कुटुंबाला आव्हान देण्यास सुरुवात केली. आम्हीच खरी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे काय चुकले, अशी भावनिक साद देत त्यांनी दौरे सुरू केले. हा वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आव्हान देणारी भाषा होऊ लागली असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी, काँगेस या तिन्ही पक्षांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने प्रवक्त्यांची नेमणूकही केली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावरही काही दिवसांपूर्वीच प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांचे बोलणे आक्रमक भासत असले, तरी शिंदे गटाची बाजू मांडण्यात ते अपुरे पडत असल्याचेच काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात यावे लागले आहे.
----------
काय आहे ट्विट
दादा हा ‘शो’ नाही
पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा...
हा ‘शो’ले आहे.
एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा!
आणि हो...
हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या
‘ट्रेलर’नेच धडकी भरली?
पिक्चर अभी बाकी है!!!

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95647 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..