कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : लाडक्या बाप्पाचे आगमन होऊन पाच दिवस पूर्ण झाले, तरीही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमी झालेली नाही. कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या भरून जात आहेत. त्यात चाकरमान्यांचे हाल होत आहेत. परिणामी रेल्वेच्या नियोजनावर कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव हा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण असून दर वर्षी गणेशभक्त आवर्जून आपापल्या गावी जात असतात; परंतु कोविडमुळे चाकरमान्यांना कोकणात जाता आले नाही. आता तब्बल दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर कोकणात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून २५० पेक्षा जास्त विशेष गाड्या, तर एसटी महामंडळाने ३ हजार ५०० पेक्षा जास्त बस सोडण्यात आल्या. भाजपकडून निःशुल्क मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली; मात्र आजही कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससारख्या रेल्वे गाड्यांतून भरगच्च गर्दीतून चाकरमान्यांना हालअपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे. रेल्वेने योग्य नियोजन न केल्यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आला आहे.
...
अतिरिक्त गाड्यांची सोय करावी!
प्रवासी संघटनेने अनेकदा रेल्वेला पत्र पाठवून तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, डबल डेकर एक्स्प्रेस, मुंबई मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला वाढीव डबे जोडण्याची आणि कोकणापुरत्याच गाड्या सोडण्याची मागणी केली आहे; मात्र याकडे कोणी लक्ष दिले नाहीत. सध्या कोकणातून गणेशभक्तांचा परतीच्या प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे रेल्वेने तत्काळ लक्ष देऊन प्रवासासाठी अतिरिक्त गाड्यांची सोय करावीत, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.
...
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दर वर्षी गणपती विषेश गाड्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेकडून यंदा सर्वाधिक २१८ गणपती विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. तसेच काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळेच यंदा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. आम्ही प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
...
आमची सरकारला विनंती आहे की, गणपती विशेष गाड्या कोकणापुरत्या मर्यादित ठेवाव्यात. आता चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्य सरकार आणि रेल्वेने मिळून गाड्यांचे योग्य नियोजन करावे. पुढील वर्षी गणपती विशेष गाड्यांचे योग्य नियोजन करावे.
- राजू कांबळे, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ
...
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना स्लीपर डब्यांऐवजी सामान्य डबे जोडण्याची आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करत आहोत. या मागणीकडे रेल्वे कडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना आजही गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे; अन्यथा कोकणी जनता या सरकारला धडा शिकवेल.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95668 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..