प्रोफेसर एस परशुरामन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोफेसर एस परशुरामन
प्रोफेसर एस परशुरामन

प्रोफेसर एस परशुरामन

sakal_logo
By

प्रोफेसर एस. परशुरामन

नुकतेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे माजी संचालक, कुलगुरू प्रोफेसर एस. परशुरामन यांचे निधन झाले. प्रोफेसर परशुरामन हे त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि सामाजिक जाणिवेसाठी ओळखले जायचे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. खऱ्या अर्थाने ‘टिस’ लोकाभिमुख केले. परशुरामन यांना जनतेचे कुलगुरू असे म्हटले जायचे.

डॉ. अश्विनी कुमार

आपल्या देशातील विद्यापीठे वास्तवापासून दूर होत चालली आहे, ती नोकरशाहीकेंद्रित आणि उच्चभ्रू झाली आहेत. या वर्दळीत प्रोफेसर एस. परशुराम एक हटके व्यक्तिमत्त्व होते. परशुरामन यांच्या कार्यकाळात टाटा सामाजिक विज्ञान संस्था खऱ्या अर्थाने समाजाशी जोडली गेली. त्यांच्या दूरदर्शी धोरणामुळे ही संस्था सामाजिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी, कामासाठी जगभरात नावारूपास आली. टाटा समाजविज्ञान संस्था वटवृक्षासारखी फोफावली. या सर्वाचे श्रेय प्रोफेसर परशुरामन यांना द्यावे लागेल.
एस. परशुरामन हे तमिळनाडूमधल्या एका गरीब कुटुंबात जन्मले. गरिबी आणि जगण्याचा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला. त्याचे शिक्षण पुण्यात झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकांच्या पंरपरेचा वारसा त्यांच्याकडे आपसूक आला. १९८६ मध्ये परशुरामन यांनी टाटा सामाजिक विज्ञान केंद्रात अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजमध्ये व्हिजिटिंग फेलो म्हणून त्यांनी काही काळ काम केले. १९९२ मध्ये पुन्हा ‘टिस’मध्ये परतले. २००४ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक आणि कुलगुरू झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी ‘टिस’ला कमिटमेंट टू एक्सलन्स (उत्कृष्टतेसाठी वचनबद्धता) आणि एक्विटी यासाठी प्रसिद्ध केले. प्रोफेसर परशुरामन हे स्कॉलर, सामाजिक कार्यकर्ते यासोबत एक उत्कृष्ट प्रशासक आणि लोकप्रिय नेतृत्व करणारे होते.
त्यांनी युवकांना दिशा देण्याचे काम केले. वेळ मिळाला की ते थेट वर्गात शिकवायला जायचे. कदाचित सर्वोच्च पदावर असताना विद्यार्थ्यांना शिकवणारे ते पहिले कुलगुरू असावेत. त्यांना भेटण्यासाठी अपॉईनमेंट घ्यावी लागत नसायची. ते पाठीवर बॅग लटकवून संधी मिळेल तेव्हा ग्रामीण, दुर्गम भागात जात असत. परशुरामन यांनी विद्यापीठ आणि सामान्य लोकांमधील अंतर कमी केले. महाराष्ट्राला संत, भक्तीपंरपरेची एक मोठी पंरपरा आहे. हाच धागा जोडत त्यांनी समाजशास्त्राला गरीबकेंद्रित आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. त्यांनी दुर्बल, दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी स्कॉलरशीप उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे ‘टिस’चे कॅम्पसमध्ये तळागळातील विद्यार्थी शिकू लागले. समाजकार्य आणि सार्वजनिक धोरणाला नवा दृष्टिकोन दिला.

२००६ पासून मला प्रोफेसर परशुरामन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मला त्यांचे दूरदर्शी काम जवळून पाहायला मिळाले.
परशुरामन यांनी त्यांच्या व्हिजनला भविष्याची कल्पना असे नाव दिले होते. ते देशाच्या भविष्याबद्दल विचार करायचे. टाटा सामाजिक विज्ञान केंद्राचे माजी संचालक एम. एस. गोरे यांनी समाजशास्त्राला जीवनाच्या जवळ आणले. प्रोफेसर परशुरामन यांनी गोरे सरांची परंपरा पुढे नेली.
प्रोफेसर परशुरामन जागतिक धरण आयोगाचे सचिव आणि सल्लागार होते. त्या वेळी मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन सुरू होते. परशुराम हे मेधा पाटकर यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मी त्यांना मान्सून सत्याग्रही म्हणतो. मान्सून सत्याग्रही म्हणजे असे सत्याग्रही जे पावसाळा सुरू झाल्यावरही मेधा पाटकर यांच्यासोबत उभे असायचे.
माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी एकही कुलगुरू पाहिला नाही, ज्याने पदावर असताना गांधीजींच्या सत्याग्रही पंरपरेने, प्रेरणेने विद्यापीठ चालवले. आजच्या युगात तुम्हाला कुलगुरू, प्रोफेसर आंतरराष्ट्रीय परिषदांना उपस्थित राहण्यासाठी धडपडताना पाहायला मिळतात; मात्र परशुरामन बॅग पॅक करून परदेशात जाण्याऐवजी अतिदुर्गम भाग, गाव, जंगलांमध्ये फिल्डवर जात असत. गरिबांसाठी तयार झालेल्या शासकीय कल्याणकारी योजनांचे फलित काय, हे बघायला ते फिल्डवर जाणे पसंत करायचे.
२००८ ते २००९ मध्ये ‘टिस’मध्ये केवळ चार ते पाच एमएचे अभ्यासक्रम होते. परशुरामन यांनी संपूर्ण ‘टिस’ची पुनर्बांधणी केली. आजमितीस टिसमध्ये ५४ अभ्यासक्रम चालवले जात आहेत.
त्यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात टिसचे गुवाहाटी, हैदराबाद इथे कॅम्पस सुरू झाले. त्यांनी ‘टिस’ला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यास केंद्रात आणि स्कूलमध्ये परावर्तित केले. त्यांच्या दुरदर्शीपणामुळे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे मल्टी कॅम्पसचे नेटवर्क उभे राहिले. ‘टिस’ आशियातील सर्वांत मोठा मल्टिनेटवर्क कॅम्पस म्हणून नावारूपास आले.
देशासाठी महत्त्वाचे धोरण आखण्यात ‘टिस’ची भूमिका वाढली. मी स्वतः केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयात नरेगा (राष्ट्रीय रोजगार हमी योजना) परिषदेचा सदस्य झालो. राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा धोरण, सोशल ऑडिट सुरू झाले. आरटीआय कायदा आणण्यात ‘टिस’चा मोठा वाटा आहे.
परशुरामन यांनी विद्यापीठ, ज्ञान आधारित व्यवस्थेत समाजाला केंद्रस्थानी ठेवले. समाज विज्ञान आणि विद्यापीठ व्यवस्थेतील थेअरी आणि प्रॅक्टिकल यातील अंतर कमी केले. त्यामुळे ते कायम फिल्डवर असायचे. प्रोफेसर परशुरामन यांच्यामुळे त्या परंपरेशी माझी नाळ जुळली. आज ‘टिस’चा विद्यार्थी जमिनीवर राहून सामान्य लोकांसोबत राहून संशोधन करतो.
मला आजही आठवते मी दिल्ली विद्यापीठातून २८ दिवसात प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. मला प्रोफेसर परशुरामन यांचा फोन आला. ते म्हणाले, तुमच्यासाठी अशी व्यवस्था करतो, की तुम्ही शासकीय धोरणावर काम करू शकाल. सामान्य माणसांसाठी काम करताना तुमचा अभ्यास, संशोधन करणे शक्य होईल. हा शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यांनी तरुण प्राध्यापक, संशोधकांची एक टिम तयार केली. जेएनयूला पहिली महिला कुलगुरू होण्यासाठी ५० वर्षे लागली. मात्र टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत फार पूर्वीच हैदराबाद, गुवाहाटी कॅम्पसच्या संचालकपद महिलांनी भूषवले आहे. ‘टिस’च्या विद्यमान संचालक शालिनी भारत यांची जडणघडण त्यांच्यात मार्गदर्शनाखाली झाली आहे.
आज टाटा सामाजिक विज्ञान केंद्र लोकशिक्षणासोबत कॉर्पोरेट केंद्रही झाले आहे. सीएसआरवर पहिला संशोधन अभ्यास ‘टिस’मध्ये सुरू झाला. प्रोफेसर एस. परशुरामन यांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक संशोधक, प्राध्यापक घडवले. परशुराम यांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्ही सर्व चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95689 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..