मृणालिनी नानिवडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृणालिनी नानिवडेकर
मृणालिनी नानिवडेकर

मृणालिनी नानिवडेकर

sakal_logo
By

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ४ ः कोणतीही निवडणूक आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो, अशी प्रांजळ कबुली देणारे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा ‘मिशन मुंबई’ या दोनदिवसीय दौऱ्यासाठी रविवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. गेल्या महापालिका निवडणुकीत ८२ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता १२० पर्यंत पोहोचायचे असून मतांच्या टक्केवारीतही ८ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याची व्यूहरचना आखायची आहे. त्यासाठी उद्या (ता. ५) होणारी बैठक ‘मिशन मुंबई’ मोहिमेचा श्रीगणेशा ठरणार आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुंबईचा कठीण पेपर काहीसा सोपा झाला असला, तरी मराठी मतांची सहानुभूती या बळावर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने आव्हान उभे करू नये, यावर भाजपकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुंबईत सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत असलेल्या मराठी मतांपैकी किमान १० टक्क्यांचा ओघ भाजपकडे यावा, तसेच सेनेचे प्राबल्य असलेल्या ५५ वॉर्डांपैकी किमान ३० ठिकाणी मतविभाजन झाले, तर ते फायद्याचे असेल, असा अहवाल एका संस्थेने तयार केल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या मनसेला मिळणारा प्रतिसाद वाढल्यास हे घडू शकेल, अशीही अटकळ आहे. राज हे राज्यातील भाजप नेत्यांच्या जवळचे असले, तरी भाजप - शिंदे गटाकडून त्यांनाही युतीत घेण्याबाबतचा निर्णय दिल्लीत होईल, असे सांगण्यात आले. २०१२ मध्ये ३१ वॉर्ड जिंकणाऱ्या भाजपने २०१७ मध्ये स्वबळावर ८२ जागा जिंकल्या. मतांच्या टक्केवारीत १५० ने वाढ झाली. २०१४ मध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपने १५, तर सेनेने १४ मतदारसंघ जिंकले होते.
उपनगरातील वातावरण भाजपला अनुकूल असले, तरी मुख्य मुंबईत ठाकरे-सेनेला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज राजकीय निरीक्षक मांडतात. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षही काही भागात जागा जिंकतील. त्यांना कमी लेखून चालणार नाही, असे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची नोंदणी, संघपरिवाराची मदत अशा बाबींबरोबरच उत्तर प्रदेशाप्रमाणेच मुंबईतील छोट्या छोट्या समाजगटांचा अभ्यास शहा-नड्डांच्या चमूने केला आहे. मुंबई जिंकणे सोपे नसले, तरी कठीणही नाही. आम्ही उत्तम कारभाराच्या हमीचा विश्वास देऊन मुंबईकरांचे मने व मते जिंकू, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी व्यक्त केला. मुंबई ही शिवसेनेचीच आहे, उद्धव ठाकरे यांनाच हे महानगर कौल देईल, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
---
लालबागच्या राजाचे दर्शन
दर वर्षी गणेशोत्सवात मुंबईला हजेरी लावणारे शहा उद्या (ता. ५) लालबागच्या राजासोबतच वांद्रे येथील आशीष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते गणपती दर्शनाला जातील. तत्पूर्वी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. गणेश दर्शनाबरोबरच महाराष्ट्राच्या कोअर टीमशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95703 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..