वडवलीतील वाडीत सुविधांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडवलीतील वाडीत सुविधांची वानवा
वडवलीतील वाडीत सुविधांची वानवा

वडवलीतील वाडीत सुविधांची वानवा

sakal_logo
By

रवींद्र पेरवे : सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. ५ : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली बौद्धवाडीतील रहिवाशांना ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या दुजाभावाचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या सुस्त कारभारामुळे खराब रस्ते, पाणीकपात, पथदिव्यांशिवाय अंधारात रात्र काढावी लागते. ग्रामपंचायत प्रशासनासमोर समस्यांचा पाढा वाचूनही दखल घेतली जात नसल्‍याने आता आपले गाऱ्हाणे थेट तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्‍‌यांसमोर मांडण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.
वडवली गावाच्या पूर्वेकडे वसलेल्या बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याचे साधारण २५ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते, हा रस्‍ता सध्या पूर्णतः उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खडी-दगड बाहेर आल्‍याने रस्त्यावरून चालणे कठीण होते. याच रस्त्यावर लावलेला सौर ऊर्जेचा दिवा दीड वर्षापासून बंद आहे. दिव्यासाठी लावलेला लोखंडी खांबही वाकला असून कोसळण्याच्या स्थितीत आहे.
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन बौद्धवाडीसाठी नवीन जलवाहिनी टाकल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून केला जात आहे; मात्र दररोज केवळ १५ मिनिटे पाणी सोडले जात असून तेही कमी दाबाने येते. पंचायत समितीने बांधून दिलेली बौद्ध समाजाची विहीर कोसळून १५ वर्षे झाली; परंतु तिची डागडुजी न केल्याने पाण्याचा पारंपरिक स्रोत नामशेष होऊन ग्रामस्थांना पाणीटंचाईला समोरे जावे लागते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बौद्धवाडीसाठी समाजमंदिर आणि शौचालये बांधण्यात आली आहेत, मात्र निसर्ग वादळाच्या तडाख्यात त्यांचे पत्रे उडून गेले. त्याची वेळेत दुरुस्ती न केल्याने ऊन-पावसाच्या माऱ्याने भिंती जीर्ण होऊन कोसळल्या आहेत. या समाजमंदिराच्या दरवाजे -खिडक्यांचीही मोडतोड झाली आहे.
याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, निधी उपलब्‍ध नसल्‍याचे उत्तर दिले जाते. मात्र निसर्ग वादळामुळे खराब झालेल्या गावांतील इतर समाजाच्या वास्तू ग्रामपंचायतीने त्यानंतर काही महिन्यांतच दुरुस्त करून दिल्या. ग्रामपंचायतीकडून होत असलेल्‍या दुजाभावामुळे वस्तीमधील नागरिक त्रस्‍त आहेत. ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळत असणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्‍याचे ग्रामस्‍थांनी सांगितले.

वडवली गावाच्या बौद्धवाडीमध्ये सर्व ग्रामपंचायतीप्रमाणेच दवंडी देण्यात येते. तेथील जलवाहिनीसाठी एक लाख तीस हजार रुपयांचे काम करण्यात आले आहे. निवारा शेडसाठी २ लाख ५० हजारांचा निधी दिला आहे. येथील लाभार्थ्यांना ग्राम निधीमधून पंधरा टक्के निधी दिला जातो. वाडी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ३ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा काढून काम करण्यात येईल. समाज मंदिर दुरुस्तीचे काम अजेंड्यावर आहे.
- प्रियांका रुपेश नाक्ती, सरपंच

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95728 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..