श्री सिद्धिविनायक गणपतीच्या सनदेस १५५ वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री सिद्धिविनायक गणपतीच्या सनदेस १५५ वर्षे पूर्ण
श्री सिद्धिविनायक गणपतीच्या सनदेस १५५ वर्षे पूर्ण

श्री सिद्धिविनायक गणपतीच्या सनदेस १५५ वर्षे पूर्ण

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई तालुक्यात अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला बघायला मिळतात. त्यातील काही ऐतिहासिक स्थळांची, पुरातन मूर्तींची रया गेली असतानाच वसईमधील पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर मात्र सुस्थितीत आहे. या मंदिराला १५५ वर्षांपूर्वी मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर यांनी ७२ रुपये आणि हनुमान मंदिराला १९ रुपयांची सनद दिल्याचा मोडी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर असलेली सनद मंदिराचे पुजारी नारायण केशव फडके यांच्याकडे जपून ठेवण्यात आली आहे.
वसई प्रांतातील अर्थात उत्तर कोकणातील शिलाहारकालीन, तसेच पेशवेकालीन (नव्याने जीर्णोद्धार झालेली) व ब्रिटिश कालखंडातील (नव्याने सनदा उपलब्ध झालेली) देवस्थाने इतिहास अभ्यासकांच्या नेहमीच कुतूहलतेचा विषय ठरलेली आहेत. यात विशेषतः श्री हनुमान, श्री गणपती, श्री शंभू महादेव, श्री आदिशक्ती ही मंदिरे प्रामुख्याने लक्ष वेधतात. इ.स. १७३९ च्या मराठ्यांच्या वसई मोहिमेतील गौरवशाली विजयानंतर वसई, आगाशी, गोखिवरे, निर्मळ, पालघर, तुंगार, बाजीपूर प्रांतातील अनेक लहान-मोठ्या देवस्थानांची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार केल्याची उदाहरणे आहेत. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे अभ्यासक श्रीदत्त राऊत आणि विष्णुप्रिया कुलकर्णी हे वसई प्रांतातील देवस्थाने व इतर इतिहासविषयक घटनांशी संबंधित मोडी लिपी पत्रांचा मागोवा घेत आहेत. यातच वसईच्या पेशवेकालीन इतिहासाची साक्ष जपणाऱ्या ‘श्री फडके गणपती’ मंदिराचा इतिहास आता प्रथमच प्रकाशित होत आहे. सध्या वसईकरांना हे गणपती मंदिर ‘श्री सिद्धिविनायक गणेश’ स्थळ रमेदी धोवली या नावानेच परिचित आहे. खाजगी मालकीच्या अंतर्गत जपलेले व सुस्थितीत असणारे हे पेशवेकालीन श्री गणेशाचे मंदिर पुजारी नारायण केशव फडके (नाना) व फडके कुटुंबीयांनी उत्तम रीतीने सांभाळले आहे. सध्या या ठिकाणी फडके कुटुंबीयांची पाचवी पिढी कार्यरत आहे. यात विशेष म्हणजे फडके कुटुंबीयांकडे मोडी लिपीत असणाऱ्या श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाची इ.स १८६७ सालची सनद जपून ठेवण्यात आली आहे. नुकताच या सनदेला सप्टेंबर २०२२ रोजी १५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सनदेत मुंबई ब्रिटिश गव्हर्नर यांचा उल्लेख असून श्री गणेश देवस्थानास ७२ रुपये व श्री हनुमान देवस्थानास १९ रुपयांची सनद नेमणूक केल्याचे नमूद आहे. यावर १० सप्टेंबर १८६७ अशी इंग्रजीतून तारीख नमूद आहे. या सनदेचे एक वेगळेपण म्हणजे यात एकाच पानावर एका बाजूस मोडी लिपीतील मजकूर व दुसऱ्या बाजूस इंग्रजी लिपीतील मजकूर लिहिण्यात आलेला आहे. वसईतील या पेशवेकालीन श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाचा इतिहास पुरावा दस्तऐवज फडके कुटुंबीयांनी अत्यंत निष्ठेने जपला आहे. पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांचे, स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात माघात पाच दिवस उत्सव, कीर्तनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

==
सनदेवर ब्रिटिशकालीन इ. स १८६७ च्या नेमणुकीबाबत मजकूर असला तरी त्यात सुरुवातीस नमूद केलेली ओळ ‘माजी राज्याचे वेळेपासून नेमणूक’ ही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण वसई विजयानंतर स्थिरतेच्या कालखंडात अनेक प्राचीन व नवीन देवस्थानाची उभारणी व नेमणूक बाबतची पत्रे उपलब्ध आहेत. यातच या देवस्थानाची १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातील काही पत्रे प्रकाशित व्हावी यासाठी करण्यात येणारे काम अंतिम टप्प्यात आहे.
- श्रीदत्त राऊत, उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे इतिहास अभ्यासक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95729 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..