आंदोलनानंतरही पुन्हा धावली एसी लोकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलनानंतरही पुन्हा धावली एसी लोकल
आंदोलनानंतरही पुन्हा धावली एसी लोकल

आंदोलनानंतरही पुन्हा धावली एसी लोकल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : एसी लोकलवरून वादंग निर्माण होऊन प्रवाशांनी आंदोलन छेडल्यावर एसी लोकल रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता; मात्र पुन्हा मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी साधी लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच साधी लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी करत हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असा इशाराही त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.
मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळी साध्या लोकलऐवजी एसी लोकल चालवण्यात येत आहेत. या लोकलविरोधात प्रवाशांनी आंदोलन केल्यानंतर प्रवाशांच्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडत रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला. अखेर रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या काही फेऱ्या तात्पुरत्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर आव्हाड यांनी यासंदर्भात कळवा आणि मुंब्रा परिसरात प्रवाशांच्या बैठका घेतल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने ९.०३ वाजता ठाणे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल सुरू केली आहे. त्यावर आव्हाड यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला सूचक इशारा दिला आहे. ठाणेकर कष्टकऱ्यांची आवडती लोकल असून ९.०३ ची लोकल ही बरोबर १०.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचायची. ती का रद्द केली? कोणासाठी रद्द केली? काहीच कळायला मार्ग नाही. ही लोकल पूर्ववत करा, अशी ठाणेकरांची मागणी आहे. प्रकरण हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
...
रेल्वे प्रवाशांसाठी मुंब्र्यात आप मैदानात
कळवा, ता. ६ (बातमीदार) ः कळवा व मुंब्र्यातील प्रवाशांच्या समस्यांसाठी काही प्रवासी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे सरसावले असताना आम आदमी पक्ष आता मैदानात उतरला असून पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अबू अल्त्मस फैजी व जिल्हा सचिव दुरिया घडियाली यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंब्रा स्थानकात आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे ट्रॅकवर उतरण्याचा इशाराही दिला आहे.
मुंब्रा स्थानकात सकाळच्या वेळी मुंब्रा, कौसा, शीळ फाटा व नजीकच्या गावातून ३० ते ३५ हजार प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात; परंतु गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना चढता येत नसल्याने अनेकांना खासगी वाहनाने खर्च करून ठाणे-मुंबई गाठावी लागत असल्याने या प्रवशांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रवासी संघटनानी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कळवा, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा स्थानकात जाऊन प्रवाशांची भेट घेतली असतानाच मंगळवारी (ता. ६) मुंब्र्यातील आम आदमी पक्षाने मुंब्रा स्थानकात आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र सोमवारी रात्री रेल्वे प्रशासनाने आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कलम १४९ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्याने मंगळवारी सकाळी साडेनऊ ते पावणेबाराच्या दरम्यान आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत शांततेत आंदोलन केले. या आंदोलकांनी दिवा स्थानकात थांबत असलेल्या जलद गाड्या मुंब्रा-दिवा दरम्यान जलद मार्गिका सुरू केल्याने मुंब्र्यात गाड्या थांबवाव्यात, सकाळच्या वेळी ऐसी गाड्यांसाठी रद्द केलेल्या साध्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, या आपल्या मागण्यांचे निवेदन मुंब्रा रेल्वे प्रबंधक एन. एच. ठाकूर यांना दिले. मागण्यांचा विचार न केल्यास जलद रेल्वेच्या ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.
...
मुंब्र्याच्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा पत्रव्यवहार करूनही काही होत नसल्याने आम्ही आंदोलनाचा इशारा दिला दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करू.
- दुरिया घडियाली, जिल्हा सचिव, आम आदमी पक्ष
...

आंबिवली रेल्वे फलाटावर रिक्षा
कल्याण, ता. ६ (बातमीदार) ः कल्याण, आंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या फलाट आणि रेल्वे स्थानकांमधील पूल, स्कायवॉकवर उभे राहून रिक्षाचालक प्रवासी घेत असतात. आता तर चक्के आंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावरच रिक्षा चालक आपली रिक्षा नेऊन प्रवासी वाहतूक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी जागरूक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सोमवारी (ता. ५) सायंकाळी सात ते आठच्या सुमारास मुंबईत गणेशदर्शन घेऊन कुटुंबासमवेत आंबिवली रेल्वे स्थानकात आलो असता भयानक चित्र पाहिले. आंबिवली रेल्वे स्थानकात कसारा दिशेने फलाटावर चालक आपली रिक्षा आणून प्रवासी वाहतूक करत होता.
कल्याण रेल्वे स्थानक व कल्याणपल्याड आंबिवली, टिटवाळा स्थानकात रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि आरटीओ प्रशासन यांचा समन्वय आणि धाक नसल्याने रिक्षाचालकांचा या परिसरात उच्छाद वाढला असल्याचा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे. रिक्षाचालकांची दादागिरी वाढली आहे. रिक्षाचालक फलाट व पादचारी पुलांच्या येथे प्रवाशांना रिक्षात बसण्याकरिता मागे लागतात. यामुळे इतर प्रवासीवर्गास विशेषतः महिला, वृद्ध, लहान मुले यांना बाहेर पडताना अडथळा होतो. नुकतीच कल्याण स्टेशन डायरेक्टर यांची भेट घेऊन पश्चिमेला रिक्षाचालकांना पे ॲण्ड पार्कचा सुविधा सुरू करावी, अशी मागणी केली आहे, असे श्याम उबाळे यांनी सांगितले. संबंधित व्हिडीओ फोटोबाबत चौकशी करू. वृत्त खरे असल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
...
लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला
डोंबिवली, ता. ६ (बातमीदार) ः ठाकुर्ली कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान पत्रीपुलाजवळ जलद मार्गावर रेल्वेरुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सकाळी ६.३० वाजता लाईनमन हिरालाल आणि मिथुनकुमार यांच्या ही बाब लक्षात आली. इंद्रायणी एक्स्प्रेस वेगाने येत असल्याचे पाहून मिथुन यांनी लाल सिग्नल दाखवत मोटरमनला धोक्याची सूचना दिली. प्रसंगावधान राखत एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्यामुळे अपघात टळला.
लाईनमन यांनी ही बाब तातडीने वरिष्ठांना कळविली. त्यानंतर मुंबईहून कल्याणकडे येणारी लांब पल्ल्याची वाहतूक पाऊण तास बंद ठेवण्यात आली होती. ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ऐन सकाळच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला. अनेक लोकल या उशिराने धावत होत्या. सकाळच्या वेळेत पुणे, नाशिक दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस, कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरात खोळंबल्या होत्या. पाऊण तास एकही लोकल रेल्वे स्थानकांत न आल्याने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, कोपर, मुंब्रा, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळी कामावर जाण्याची घाई असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला. सव्वा सातच्या दरम्यान काम पूर्ण करत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. लाईनमन हिरालाल आणि मिथुनकुमार यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळल्याने त्या कामगारांचे रेल्वेच्या वरिष्ठांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95876 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..