लोक कलाकारांसाठी लोकमनाचा बाप्पा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोक कलाकारांसाठी लोकमनाचा बाप्पा!
लोक कलाकारांसाठी लोकमनाचा बाप्पा!

लोक कलाकारांसाठी लोकमनाचा बाप्पा!

sakal_logo
By

वडाळा, ता. ७ (बातमीदार) ः आपली संस्कृती लोककलेच्या माध्यमातून जपणाऱ्या कलाकारांना अनेक वर्षांपासून काम मिळणे कठीण झाले आहे. उत्सवाचे रूपांतर इव्हेंटमध्ये झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. मात्र, लोककला सदैव जिवंत राहावी आणि लोककलाकारांची कला पाहता यावी, यासाठी वाळकेश्वरमधील बाणगंगा येथील पिंपळेश्वर बाप्पा मंडळाने कलेली सजावट सध्या उल्लेखनीय ठरत आहे. लोककट्टा अर्थात ‘लोकमनाचा बाप्पा’ असा विषय घेऊन मूर्तीभोवती लोक कलाकार असलेला बोलका देखावा सादर करून त्यांनी जनसामान्यांमध्ये समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकपरंपरेसाठी व लोककलांसाठी ओळखले जाते. इथल्या लोककलावंतांमुळे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख देशातच नाही; तर जगात निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला गालबोट लागत आहे. अनेक दिवसांपासून उत्सवाचे रूपांतर इव्हेंटमध्ये झाल्याने लोक कलाकारांना आपली कला सादर करायला संधी मिळत नाही. अनेक कलाकार गणेशोत्सवातच घडलेले आहेत. एकांकिका किंवा एकपात्री अभिनय, वेशभूषा इत्यादी स्पर्धा रद्द झाल्याने कलाकारांची जडणघडणच होत नसल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच कोरोना काळात लोककलेला उतरती कळा लागली. परिणामी अनेक कलाकारांनी लोककला सोडून वेगळ्या कामांना पसंती दिली. परिणामी आपली संस्कृती कुठेतरी धोक्यात येत असल्याची दखल घेत यंदाच्या वर्षी पिंपळेश्वर बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लोककलाकारांसाठी लोककट्टा विषय घेऊन अनोखी सजावट केली आहे.

लोककलेचे जतन
- सजावटीत २४ पर्यावरणपूरक बाप्पा लोककलेतील वेगवेगळ्या पेहरावात साकारण्यात आले आहेत. त्यातील काही गणपती लोक कलाकारांनी साकारलेले आहेत.
- सगळे कलाकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील आहेत. दोडामार्गातील चपई किंवा झाडीपट्टी करणारे चंद्रपूर भागातील काही कलाकारही त्यात आहेत. तमाशा किंवा कळसूत्री करणारे कलाकारही आहेत. अशा अनेक कलाकारांनी संपूर्ण उपक्रमासाठी हातभार लावला आहे.
- लोककलेचे जतन आणि संवर्धन होण्याच्या उद्देशाने सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक असून वेगवेगळ्या प्रकारच्या लोक कलाकारांचे कटआऊट त्यात सादर करण्यात आले आहेत.

एकाच सजावटीत २५ बाप्पा एकत्र
यंदा पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचे २५ वे वर्ष आहे. त्यानिमित्त २४ अधिक एक मुख्य मूर्ती असे २५ गणपती आपल्याला मंडळाच्या मंडपात एकत्र एकाच सजावटीत सांस्कृतिक लोककलेच्या वेगवेगळ्या पेहरावांत बघायला मिळतात. पर्यावरणपूरक काम करणारे राष्ट्रपती पुरस्कारविजेते सुमित पाटील यांनी देखावा साकारला आहे. देखव्याच्या सादरीकरणासाठी एक महिना लागल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग
निसर्गाशी संवाद साधत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित; परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात. लोककला आपल्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग असतो. लोकजीवनात गीत, नृत्य, नाट्य, हस्तकला इत्यादी सर्वच आविष्कारांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96017 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..