शंभर टक्के कचरामुक्तीचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर टक्के कचरामुक्तीचा नारा
शंभर टक्के कचरामुक्तीचा नारा

शंभर टक्के कचरामुक्तीचा नारा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अवघ्या काही गुणांमुळे देशात पहिला येण्याचा मान हुकल्याने नवी मुंबई महापालिकेने १०० टक्के कचरा वर्गीकरणासाठी दंड थोपटले आहेत. यासाठी पालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करताना तुर्भ्यातील कचरा प्रक्रिया केंद्रदेखील २४ तास अवितरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
राज्य सरकारतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या स्वच्छता स्पर्धेत नवी मुंबई शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता स्पर्धेतही नवी मुंबईने चमकदार कामगिरी केली आहे. सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमाकापर्यंत मजल मारणाऱ्या नवी मुंबईने गेल्या वर्षी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पहिला येण्याचा मान पटकावला होता; परंतु सर्व विभागवारीतून शहराला स्वच्छतेसोबतच कचरा वर्गीकरणात मात्र कमी गुण मिळाल्यामुळे देशातून पहिला क्रमांक पटकावण्याची संधी हुकल्याने नवी मुंबई महापालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण ८० टक्क्यांवरून शंभर टक्क्यांवर नेण्यासाठी नागरिकांना कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी वर्गीकरण केलेला ओला व सुका कचऱ्याची वाहतुकीसाठी वेगवेगळ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुर्भ्यातील कचराभूमीवरील प्रक्रिया केंद्र २४ तास कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.
-------------------------------------
वर्गीकरणातील अपयशामुळे गुणांमध्ये कपात
शहराच्या सर्वांगीण स्वच्छता आणि महापालिकेच्या कागदपूर्ततेसोबतच कचरा वर्गीकरण, नागरिकांचा अभिप्राय, नागरिकांचा समावेश, स्वच्छतेची जनजागृती, नागरिकांमध्ये जागृती, स्वच्छतेची अद्ययावत उपकरणे आणि स्वच्छता दूतांची काळजी, प्रक्रिया केंद्र आदींबाबत स्पर्धेत वेगवेगळ्या गटवारीला गुण निश्चित केले आहेत. नागरिकांचा अभिप्राय, स्वच्छता, अद्ययावत उपकरणे आदींमध्ये महापालिकेला पैकीच्या पैकी गुण मिळाले खरे; परंतु नवी मुंबई शहरात शंभर टक्के वर्गीकरण होत नसल्याने पालिकेच्या गुणात कपात झाली. त्यामुळे पालिकेची घसरण होऊन देशात पहिला क्रमांक हुकल्याची चर्चा आहे.
---------------------------------------
प्रशासनाकडून दररोज आढावा
शहरात रोज गोळा केलेल्या कचऱ्याची आकडेवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून दैनंदिन गोळा केली जाते. गोळा झालेल्या कचऱ्यापैकी ओला आणि सुका कचऱ्याचे वजन किती यांची नोंद केली जाते. सुक्या कचऱ्यापैकी प्लास्टिकचा कचरा किती होता, घातक कचरा किती होता, याबाबतची माहिती रोजच्या रोज गोळा केली जात आहे.
---------------------------------------
२५९ वाहनांच्या फेऱ्या
सरासरी एक हजार १४८ टन कचरा गोळा होतो. सर्व मिश्रित ५८३ टन कचरा असतो. १३९ टन ओला कचरा असतो. १८ टन सुका कचरा आहे. शहरातून गोळा झालेल्या कचऱ्यात ८४ टन पाळा-पाचोळा कचरा असतो. वाशीच्या एपीएमसी मार्केटमधून ८४ टन कचरा गोळा होतो. इतर ठिकाणांहून २४३ टन कचरा गोळा होतो. हा सर्व कचरा गोळा करण्यासाठी २५९ वाहनांच्या फेऱ्या माराव्या लागतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96029 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..