गणरायाच्या विसर्जनावर प्रशासन सज्‍ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाच्या विसर्जनावर प्रशासन सज्‍ज
गणरायाच्या विसर्जनावर प्रशासन सज्‍ज

गणरायाच्या विसर्जनावर प्रशासन सज्‍ज

sakal_logo
By

अलिबाग, ता. ८ (बातमीदार) ः अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन शुक्रवारी (ता.९) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस दलामार्फत ठिकठिकाणी कडेकोट पहारा ठेवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवानांसह सुमारे दीड हजार पोलिसांची गणेशभक्‍त, विसर्जन मिरवणुकांवर नजर असेल.
जिल्ह्यात दहा दिवसाच्या एकूण १७ हजार ६२३ गणेशमूर्तींचे तलाव, नदी व समुद्र अशा एकूण २१४ ठिकाणी मूर्तींचे विसर्जन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम, महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत विभागाशी वेळोवेळी बैठका घेऊन विसर्जन स्थळांची पाहणीही पोलिस दलामार्फत करण्यात आली आहे.
अलिबागसह जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनारे, नदी, तलाव, खाडी अशा एकूण दीडशेपेक्षा अधिक विसर्जन स्थळांवर दहा दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला साधारण सायंकाळी पाचनंतर सुरुवात होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य संकलनासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायतींमार्फत नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलिस यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्थांचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी विशेष लक्ष आहे. काही ठिकाणी स्पीकर, तर काही ठिकाणी बेंजो, डिजेच्या आवाजात मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात त्रुटी राहू नये, याची दक्षता पोलिस घेत आहेत.

परजिल्‍ह्यातील कुमक दाखल
पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व अन्य सुरक्षा यंत्रणा अशी एकूण दीड हजार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय दोन राज्य राखीव पोलिस दलाचे पथक, दोन दंगल नियंत्रण पथक, सहा स्ट्रायकिंग फोर्स, एक शीघ्र कृती दल अशी यंत्रणा सज्ज आहे. यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपविभागीय अधिकारी, नाशिक, सोलापूर येथील पोलिस उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सकाळपासून रात्री विसर्जन होईपर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.

स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जन
अलिबाग नगरपालिकेच्या वतीने दुर्घटना टाळण्यासाठी विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर मंडप उभारले असून नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द केल्‍यावर बोटीतून विसर्जित केल्‍या जातील. निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान व अलिबाग नगरपरिषद यांच्यामार्फत ओले व सुके निर्माल्य संकलित करून त्यांचे विलगीकरण केले जाणार आहे.

मदत केंद्रासह पोलिस कक्ष
विसर्जनाच्या ठिकाणी मदत केंद्रासह पोलिस कक्ष उभारण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून किनारा परिसरात सीसी टीव्ही बसवले आहेत. रात्रीच्या वेळी विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांकरिता वीजपुरवठा, दिव्यांची सोय केली आहे. विसर्जनसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच स्‍वतःसह अन्य भाविकांची काळजी घ्‍यावी, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलिबाग व खोपोली या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये खोपोलीत दोन तर अलिबागमध्ये समुद्रकिनारी एक असे तीन कृत्रिम तलाव उभारले आहेत. या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद

रायगड पोलिस दलामार्फत ८० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत बंदोबस्त राहणार आहे. रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जनाला परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर राहणार आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान काही गैरप्रकार घडू नये यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोपनीय शाखा व अन्य पोलिस साध्या वेशात तैनात आहेत. नागरिकांनी सणांचा आनंद घेताना पोलिसांनाही सहकार्य करावे, आवाहन करण्यात येत आहे.
- अशोक दुधे, अधीक्षक, रायगड

.............

गंगामाता घाटावर विजर्सन
पोलादपूर (बातमीदार) ः शहरात २ सार्वजनिक तसेच १२ घरगुती बाप्पांचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. यावेळी मंडळांनी भव्य मिरवणुका काढण्याचे नियोजन केले आहे. शहरातील गंगामाता घाट येथे गणपतीचे विसर्जन व्यवस्थेसह निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96122 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..