चाफ्याचा सुगंध गणेशोत्सवातच रुसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाफ्याचा सुगंध गणेशोत्सवातच रुसला
चाफ्याचा सुगंध गणेशोत्सवातच रुसला

चाफ्याचा सुगंध गणेशोत्सवातच रुसला

sakal_logo
By

प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ८ ः कोरोनाचे गडद संकट दूर झाले असले, तरी चाफा बागायतदारांना ऐन गणेशोत्सव काळातच आर्थिक फटका बसला आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाफ्याची फुले बोटावर मोजण्याइतकीच येत असल्यामुळे तीस वर्षांतील सर्वात कमी उत्पादनाची नोंद झाल्याने बागायतदार हवालदिल आहे.
वसई तालुक्यात चांगले उत्पन्न मिळत असल्याने आगाशी ते नंदाखाल, अर्नाळ्यासह अन्य फुलांची लागवड शेतकरी करतात. गेल्या ३० वर्षांपासून वसई तालुक्यात चाफ्याची बागायत केली जात आहे. मात्र, कोरोनाकाळातील निर्बंधामुळे मंदिरे, सण उत्सव साजरे होत नसल्याने हजारो शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गणेशोत्सवात तरी चांगली कमाई होईल, या आशेत चाफ्याची लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदा चाफ्याला उशिरा बहर आल्याने ऑगस्ट महिन्यात झाडावरील कळ्या दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे सणासुदीत दोन पैसे कमावण्याची संधी हातातून गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. हवामानात झालेला बदल, पावसाची अनिश्चितता किंवा प्रदूषणाचा चाफ्याच्या झाडावर परिणाम झाला असल्याची शक्यता अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने व्यक्त केली आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन करावे, अशी मागणी केली आहे.
-------------------------------------------
१५ लाख नगांची दररोज विक्री
गणेशोत्सवाला सुरुवात होताच बाजारात चाफ्याला २५० रुपये शेकडा; तर तीन दिवसांपूर्वी ८०० रुपये बाजारभाव झाला होता. त्यामुळे या पिकाला शेतकरी पसंती देत आहे. पहाटे लवकर उठून हा माल फूलबाजारात विक्रीसाठी नेला जातो. मार्च ते जुलै महिन्यात चाफ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे पूर्वी १५ लाख फुले दररोज मुंबई व आजूबाजूच्या फूलबाजारात जात होती.
---------------------------
उत्पादनात कमालीची घट
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात या मोठ्या बागायतदारांची दिवसाकाठी ५ ते ८ हजार चाफ्याची फुले येत होती. मात्र, सद्यस्थितीत त्याचे प्रमाण १५० ते २०० इतके झाले आहे. ज्यांच्याजवळ ५० ते १०० झाडे आहेत. त्या ठिकाणी केवळ ५ ते १५ इतकीच फुले येत आहेत; तर काही बागायतीत एकही फूल येत नाही.
----------------------------------
गेल्या तीस वर्षांत चाफ्याच्या उत्पादनात इतक्या प्रचंड प्रमाणात घट झालेली नाही. बागायतदारांची मेहनत, पैसा, वेळ वाया गेला आहे. एेन गणेशोत्सवात हे आर्थिक संकट आले असल्याने कृषी विभागाने संशोधन करण्याची गरज आहे.
- किरण पाटील, अध्यक्ष, अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
-------------------------------
वसई : चाफ्याच्या झाडांना फुलांचा बहर खुंटला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96130 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..