आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांत रुपांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांत रुपांतर
आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांत रुपांतर

आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांत रुपांतर

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीत घेतलेल्या बैठकीत गावांमध्ये सविस्तर आराखडे तयार करण्याची सूचना केली. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बैठकीत दिली.

अनुसूचित जमातीची म्हणजे आदिवासी समाजाची जास्त लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदी आदर्श ग्रामविकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांची निवड झाली आहे. त्यात शहापूर तालुक्यातील ४४, भिवंडीतील ३६, मुरबाडमधील २५, अंबरनाथमधील १० व कल्याणमधील एका गावाचा समावेश आहे. दर वर्षी एक पंचमांश गावांचा विकास केला जाणार असून, पाच वर्षांत टप्प्या-टप्प्याने सर्व गावांचा विकास केला जाणार आहे. या गावांमध्ये योजनेची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विशेष बैठक घेतली. केंद्राच्या इतर विभागाकडील योजना व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरणाच्या माध्यमातून आदिवासी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या. या वेळी आमदार दौलत दरोडा, आदिवासी विभागाच्या शहापूर प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक दीपक कुटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आदिवासींची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सरकारच्या विविध योजनांद्वारे मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. त्याचबरोबर ग्रामस्थांचे आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रस्ते, दूरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कौशल्य वृद्धी कार्यक्रम, सामुदायिक वन विकास, वनधन कार्यक्रम, जलस्रोतांचे संरक्षण आदी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या गावांचा आदर्श गाव म्हणून उदय होणार आहे.
प्रत्येक गावाला २० लाख रुपयांचा निधी
ठाणे जिल्ह्यातील गावांचा विकास करण्यासाठी महसुली गावानुसार आराखडा तयार करावा. आराखडा मंजूर झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या विकासयोजनांची सांगड घालून गावामध्ये योजना राबवावी. या गावांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून प्रत्येक गावाला २० लाख रुपये निधी दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
-----------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदिवासी गावांच्या विकासाबरोबरच आदिवासी माणसाच्या प्रगतीचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार देशभरात प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येत आहे. देशातील ३ हजार ६०५ गावांचा पाच वर्षांत विकास केला जाईल.
- कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96155 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..