हवेची गुणवत्ता सुधारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवेची गुणवत्ता सुधारणार
हवेची गुणवत्ता सुधारणार

हवेची गुणवत्ता सुधारणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : नवी मुंबई महापालिकेने शहराचा शुद्ध हवा कृती आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली आहे. ७ सप्टेंबर हा दिवस निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघातर्फे राबवला जातो. त्यानिमित्ताने महापालिकेत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते.
केंद्र सरकारच्या शहर कृती आराखड्याची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रभावीपणे केली जात आहे. शुद्ध हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके विहीत मर्यादेत आणण्यासाठी पालिकेचा आराखडा महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम, प्रकल्प, सुविधा कामे करण्यात आली आहेत. त्याची विस्तृत माहिती याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणार्‍या वायुप्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी उड्डाणपूल निर्मिती, इलेक्ट्रिक बसचा वाढता वापर, जनसायकल सहभाग प्रणालीतून इंधन विरहीत सायकल वाहनाला प्राधान्य, २१ कि.मी. सायकल ट्रॅकची निर्मिती, ओला-सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर भर, दैनंदिन ७५० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, बांधकाम व पाडकाम कचर्‍यावर (सी ॲण्ड डी वेस्ट) शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया, महानगर गॅस लि. मार्फत पीएनजीची जोडणी जास्तीत जास्त घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरवणे, मियावाकी स्वरूपाची व्यापक शहरी जंगल निर्मिती करून प्रतिमानसी एक झाड असे नवी मुंबई पालिकेतर्फे राबवल्या जाणार्‍या विविध बाबींची माहिती या वेळी संजय देसाई यांनी दिली.
नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता मापनासाठी आणि त्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ हवा कृती आराखड्याचे सल्लागार श्रीकांत सोळुंके यांनी पालिका शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी करत असलेल्या कृतिशील कामांची माहिती दिली.

--------------------------------
पर्यावरणपूरक वाहतूकीवर भर द्या
वास्तुविशारद तथा वाहतूक नियोजनकार प्रांजली देशपांडे यांनी विविध शहरातील वाहतुकीमुळे होणार्‍या वायुप्रदूषणाची माहिती देत शाश्वत वाहतूक साधनांचा वापर करून हवेची गुणवत्ता व पर्यावरणाचा दर्जा सुधारण्याबाबत उपयोगी विवेचन केले. वायुप्रदूषणामुळे पुढच्या पिढीच्या आरोग्याला धोका होऊ नये, यासाठी आपल्या पिढीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने चालणे, सायकलिंग व खासगी वाहनांचा कमीत कमी वापर करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका दैनंदिन आचरणात आणण्याची गरज त्यांनी विषद केली. राष्ट्रीय कृती आराखड्यातील उद्देशानुसार रस्ते हे वाहनांसाठी नाहीत, तर माणसांसाठी आहेत. हे वाक्य कोरून ठेवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक माणसाने आपले योगदान द्यायला हवे. पुढच्या पिढीचे आरोग्यदायी भविष्य घडवायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-----------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96177 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..