बनावट राजकीय पक्षांवर आयकर विभागाची कारवाई.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income tax department raids at 205 places against fake political parties..
बनावट राजकीय पक्षांवर आयकर विभागाची कारवाई..

बनावट राजकीय पक्षांवर आयकर विभागाची कारवाई..

मुंबई : झोपडपट्ट्या, दुकाने आणि फ्लॅटमधून देशातील राजकीय पक्षांचा कारभार करणाऱ्या आणि पक्षाच्या नामे कोट्यवधींच्या देणग्या घेणाऱ्या राजकीय पक्षांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने देशात २०५ ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबईत सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने कारवाई केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील अनेक नोंदणीकृत, परंतु संशयास्पदरीत्या कारभार करणाऱ्या राजकीय पक्षांवर छापे टाकले. अशाच एका छाप्यात घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या एका पक्षाचा पत्ता अधिकाऱ्यांना मिळाला. तपास यंत्रणांनी माग काढला असता गेल्या तीन वर्षांत ३७० कोटी रुपयांची देणगी या कथित पक्षाने स्वीकारली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

घड्याळ दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे; परंतु देणग्या किंवा प्रमाणपत्रे याबद्दल त्याला माहिती नाही. अधिकारी या पक्षाच्या पक्षाध्यक्षाचा माग काढत होते. पक्षाध्यक्ष गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहत असल्याची माहिती दुकानदाराने दिली. या माहितीच्या आधारे, अहमदाबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षाच्या अध्यक्षाचा शोध घेतला आणि चौकशी केली असता त्याने तीन टक्के कमिशनसाठी देणगीचे प्रमाणपत्र दिल्याची कबुली दिली. उरलेले पैसे संस्थांच्या अनेक खात्यात जमा केले गेले आणि नंतर रोख स्वरूपात देणगी देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना परत केले. उत्तर प्रदेशात अशा आणखी दोन पक्षांचा समावेश होता.

झोपडी, फ्लॅटमध्ये पक्षांची कार्यालये
मुंबईतील सायनमधील एका झोपडपट्टीत एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय शंभर चौरस फुटांच्या झोपडपट्टीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले. बँकेच्या नोंदीनुसार या पक्षाने गेल्या दोन वर्षांत सुमारे १०० कोटी रुपयांच्या देणग्या स्वीकारल्या. जेमतेम शंभर चौरस फुटांचे कार्यालय त्या राजकीय पक्षाचे होते. त्यानंतर बोरिवलीत एका छोट्या फ्लॅटमध्ये पक्ष कार्यालय होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्थांकडून सुमारे ५० कोटी रुपयांच्या देणग्या स्वीकारल्या होत्या.

देशभरात २०५ ठिकाणी कारवाई
देशभरात मागील दोन दिवसांत सुमारे २०५ ठिकाणांवर आणि अशा अनेक राजकीय पक्षांवर छापे टाकण्यात आले आहेत. ज्यांचा वापर एंट्री ऑपरेटर्सद्वारे संस्था आणि व्यक्तींना प्रवेश आणि कर सूट देण्यासाठी केला जात होता. मुंबई आणि गुजरातमध्ये अशा पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे एकूण प्रमाण प्राथमिक अंदाजानुसार २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते आणि ते आणखी वाढू शकते. असे अनेक पक्ष गुजरातमधील अहमदाबादमधून चालवले जातात. अशा २१ राजकीय पक्षांवर गुजरातमध्ये छापे टाकण्यासाठी १२० हून अधिक अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असलेले आयकर अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईहून पाठवण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96206 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..