अंबा, कुंडलिकेतून नवी मुंबईची तहान भागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबा, कुंडलिकेतून नवी मुंबईची तहान भागणार
अंबा, कुंडलिकेतून नवी मुंबईची तहान भागणार

अंबा, कुंडलिकेतून नवी मुंबईची तहान भागणार

sakal_logo
By

शरद वागदरे, वाशी
सिडकोने महामुंबई व नैना क्षेत्रासाठी भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी कोंढाणे, बाळगंगा, हेटवणे (अतिरिक्त) या धरणांचे पर्याय उपलब्ध केलेले असताना नवी मुंबई महापालिकेने नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. बेलापूरपासून ९५ किलोमीटर लांब असलेल्या कोलाडच्या किनाऱ्यावरील अंबा व कुंडलिका नदीतील जलविद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी नवी मुंबईपर्यंत आणण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या सध्या १७ लाख ६० हजार असून, २०३८ पर्यंत ती ४२ लाखांच्या घरात जाणार आहे. त्यासाठी हा नवीन पाण्याचा आराखडा तयार केला जात आहे.
------


नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मोरबे धरणातील ४५० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवठा केला जात आहे. या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसी नागरी क्षेत्रासाठी पालिका बारवी धरणातील ४५ दशलक्ष लिटर पाणी विकत घेते. हे पाणी कमी-जास्त होत असल्याने एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरी वसाहतीला तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी आहेत. नवी मुंबईचा विकास होत असताना तेथील वाढत्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी सिडको आणि पालिका एकाच वेळी जल आराखडा तयार करत आहे. यात पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्यांसाठी आणखी ४०० दशलक्ष लिटर पाणी लागणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी पालिकेने ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाणस्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रायगडमध्ये पाणी स्रोताची जास्त उपलब्धता असल्याने जलसंपदा विभागाने सहा धरणांची उभारणी यापूर्वीच केली आहे. मोरबे धरणाच्या परिसराला पाणी साठवणाची मर्यादा असल्याने हे धरण ४५० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त दैनंदिन साठवण करू शकणार नाही, असा अहवाल आहे. माथेरानच्या डोंगर कपारीतून धावरी नदीवाटे येणाऱ्या पाण्याला मर्यादा आहेत. मोरबे धरणाची उंची वाढवूनही साठवण पूर्ण होणार नाही. त्यामुळे पालिकेने नवीन पाण्याचा शोध घेताना थेट बेलापूरपासून ९५ किलोमीटर लांब असलेल्या कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रामधील पाण्यावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी रायगड जलसंपदा विभाग कोलाड यांना या पाण्याची उचल करता येईल का? याची चाचपणी करण्याची विनंती केली आहे. कुंडलिकामधून ९९४ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची नवी मुंबई महापालिका करत तयारी आहे. हे पाणी आणल्यास नवी मुंबई पाण्याबाबत पुन्हा एकदा स्वयंपूर्ण होणार आहे.

९९४ दशलक्ष घनमीटर उचलणार
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात १९२७ मध्ये टाटा पॉवर कंपनीने भिरा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून पहिल्यांदा ३०० मेगावॉट वीज निर्माण केली जात होती. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आली. विद्युत निर्मितीनंतर पाण्याचा विसर्ग हा कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. या पाण्याचा उपसा करून ते नवी मुंबईपर्यंत आणण्याची पालिकेची योजना आहे. कुंडलिका नदीतील पाणी जलसंपदाच्या एका अहवालानुसार २,२८७ दशलक्ष घनमीटर इतके आहे. त्यातील ९९४ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी पालिका करत आहे.

प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढणार
नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात गेली आहे. सिडकोच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकासाठी; तसेच काही अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधली जात आहे. खासगी विकासकांनीही सिडको भूखंड विकत घेऊन आलिशान घरे बांधण्याचा सपाटा लावला आहे. सिडकोनिर्मिती धोकादायक आणि ३० वर्षे जुन्या इमारतींची पुनर्बांधणी वाशी, नेरूळ, घणसोली या नोडमध्ये सुरू झाली आहे. २०पेक्षा जास्त प्रकल्पांना पालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारने केवळ अडीच वाढीव चटई निर्देशांक मंजूर केला होता; पण अलीकडे दोन वर्षांपूर्वी सरकारने राज्यातील काही मोठ्या शहरांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने शहरात पाच ते सहा वाढीव एफएसआयने जुन्या इमारतींची पुनर्बांधणी होत आहे. शहरातील २९ गावांच्या आजूबाजूला बेकायदा बांधकामे आजही बिनबोभाट उभी राहत आहेत. एमआयडीसीतील ४९ झोपडपट्ट्या लवकरच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत कात टाकणार आहेत. याशिवाय जुन्या कारखान्यांच्या जागी निवासी घरांना सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. रेल्वे, मेट्रो, विमानतळ या वाहतूक साधनांमुळे ही संख्या नियमित लोकसंख्यांपेक्षा जास्त असणार आहे.


नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात या शहराला पाण्याची नितांत गरज भासणार आहे. पालिकेच्या मोरबे धरणाला मर्यादा असल्याने इतर स्रोत शोधले जात आहेत. त्यापैकी अंबा व कुंडलिका नदीतील विसर्ग पाण्याचा विचार केला जात आहे. अशाच प्रकारे इतर स्रोताची चाचपणी केली जात आहे. नवी मुंबईतील भविष्यात कमीत कमी ८५० दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्याचा जल आराखडा तयार केला जात आहे. त्यातील हा एक पर्याय आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96229 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..