भाकरीतून शेकडो कुटुंबांना ‘लक्ष्मी’दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकरीतून शेकडो कुटुंबांना ‘लक्ष्मी’दर्शन
भाकरीतून शेकडो कुटुंबांना ‘लक्ष्मी’दर्शन

भाकरीतून शेकडो कुटुंबांना ‘लक्ष्मी’दर्शन

sakal_logo
By

शुभांगी पाटील ः तूर्भे

‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली...’ असे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांच्या अवघ्या जीवनाचे सार कविवर्य नारायण सुर्वे यांनी एका ओळीत मांडले. हा चंद्र हाती पडला की पोटातली आग शांत होते. हाताला चटके बसल्याशिवाय हे होत नाही, असे वास्तव बहिणाबाईंनी सांगितले आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या २९ गावांतील शेकडो कुटुंबांसाठी चुलीवरच्या भाकरीचा हा चंद्र उदरनिर्वाहाचे साधन आहे. भाकरीच्या व्यवसायातील आर्थिक उलाढाल ही दिवसेंदिवस वाढतच असून बेलापूर ते दिघा या पट्ट्यात दिवसाला ५० ते ६० हजार तांदळाच्या भाकरी फस्त केल्या जातात.
तांदळाची गरमागरम, चवदार भाकरी ही आता केवळ आगरी-कोळी समाजाची खास आवड बनली आहे. पाच-सात वर्षांपासून खानावळीपासून पंचतारांकित हॉटेलांपर्यंत भाकरीला मागणी आहे. झणझणीत, गरमागरम मटण, कोंबडी रश्‍शाचा मेनू या भाकरीशिवाय अपूर्णच... काही वर्षांपूर्वी लग्नसराईतच आणल्या जाणाऱ्या भाकरी आता कधीही ऑर्डर दिली की घरपोच मिळतात. आगरी-कोळी महोत्सवात तर खवय्ये या भाकऱ्यांवर तुटून पडतात. आता तर नॉन महाराष्ट्रीयन लोकांना देखील तांदळाच्या भाकरीची चटक लागल्याने त्यांच्याही जेवणात आता भाकरी सर्रास पाहायला मिळते. तांदळाची भाकरी बनविणे अतिशय मेहनतीचे, कसबाचे काम. मातीची चूल आणि मातीच्याच खापरीवर भाजून तयार केलेली ही भाकरी पाहताक्षणी मनाला भुरळ पाडते. या भाकरीला लग्नसोहळे, लहान-मोठ्या मेजवान्या, खानावळी, हॉटेल, तसेच घरगुती स्तरावर मोठी मागणी आहे. आगरी-कोळी महिलांकडून या भाकरीची परंपरा आजही जिवंत ठेवण्यात आली आहे.
----------------------------------
महिलांचा एकोपा
नवी मुंबई शहराप्रमाणेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण या भागांतही हॉटेल, खानावळी आणि घरगुती स्तरावर तांदळाच्या भाकरी पुरवल्या जातात. बेलापूर, दिवाळे, करावे, नेरूळ, सानपाडा, कोपरी, शिरवणे, बोनकोडे, घणसोली, गोठीवली आदी गावांतून मोठ्या प्रमाणावर भाकऱ्यांची ऑर्डर घेतली जाते. गावागावांत महिला एकत्र येऊन भाकऱ्या भाजतात. या महिला आजही तितक्‍याच मेहनतीने भाकऱ्या थापत आहेत. प्रत्येक गावातून दहा ते पाच हजार भाकरी बनवल्या जातात.
--------------------------------
तांदूळ आणि खापरी
तांदळाची भाकरी बनविण्यासाठी खास पटनी जातीचा जाडसर तांदूळ वापरला जातो. तांदळाचे दर वाढले की भाकरीही महागते. उकळी आलेल्या पाण्यात पीठ शिजवून ती बनविली जाते. मातीची चूल आणि मातीच्याच खापरीवर भाजलेली ही भाकरी शिळी होत जाते, तशी तिची चवही वाढतच जाते. त्यामुळे ही भाकरी कधीच वाया जात नाही. भाकरीप्रमाणेच खापरी व चुलीलाही मागणी वाढली आहे. भाकरीच्या व्यवसायातून खापरीची परंपरा टिकून राहिली आहे. खापरीची किंमत १०० ते १५० पर्यंत पोहचली आहे.
-------------------------------------------
एक कोटी २० लाखांची उलाढाल
भाकरीची किंमत आकारमानानुसार ठरवली जाते. बेलापूरपासून दिघ्यापर्यंतच्या हॉटेल व खानावळींत दिवसाला ३० ते ४० हजारांहून अधिक भाकऱ्या मागवल्या जातात. खवय्ये महिन्याला ५० हजार; तर वर्षभरात तीन लाख ६ लाख भाकऱ्या फस्त करतात. यातून एक कोटी २० लाखांची उलाढाल होते.
--------------------------------------------
या व्यवसायात आता शेकडोहून अधिक महिला उतरल्या आहेत. त्यात काहींनी रोजंदारीवर महिला ठेवल्या आहेत. त्यामुळे दिवसाला ५० ते ६० हजारांहून अधिक भाकऱ्यांची ऑर्डर पूर्ण केली जाते. भाकरीच्या या व्यवसायातून महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.
- सरोज पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या, नवी मुंबई महापालिका
-----------------------------------------------
भाकरीचा व्यवसाय हा खरोखरच कष्टमय आहे. आजही तितक्‍याच मेहनतीने आगरी-कोळी समाजातील महिलांनी भाकरीची परंपरा चालू ठेवली आहे. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी खरोखच उत्तम आहे.
- चंद्रकांत तांडेल, संस्थापक, आगरी कला संस्कृती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96245 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..