विरार : इंटरनेटमुळे निराधार महिलेला गवसले कुटुंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet on mobile
इंटरनेटमुळे निराधार महिलेला गवसले कुटुंब

विरार : इंटरनेटमुळे निराधार महिलेला गवसले कुटुंब

sakal_logo
By

विरार, ता. १० (बातमीदार) : पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील मिल्की येथील ५० वर्षीय महिला दोन वर्षांपूर्वी घरच्यांची नजर चुकवून निघाली होती. ती तब्बल एक वर्ष मुंबईत रस्त्यावर निराधार अवस्थेत जगत होती. बोरिवली येथे ही महिला पोलिसांना आढळल्यावर तिला विरार येथील ‘जीवन आनंद’ संस्थेत दाखल केले. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून सुरू झाला तिच्या नातेवाईकांचा शोध. तो बारंबाठीच्या सरपंच पौर्णिमा दास, तेथील आमदार बेचाराम मन्ना यांच्याशी संपर्क केल्यावर संपला. तब्बल दोन वर्षांनंतर या महिलेचा तिच्या कुटुंबीयांशी व्हिडीओद्वारे संपर्क झाला.

तस्लिमा खातून ही पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील मिल्की गावची रहिवासी. ती आपल्या नातेवाईकांची नजर चुकवून घराबाहेर पडली होती. घरातून बाहेर पडल्यावर गावाजवळच्या हावडा वर्धमान मार्गावरील बलराम बाठी रेल्वेस्थानकामधून हावडा आणि तेथून मुंबईला आली. बंगाली भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा बोलता येत नसल्याने ती कोण, कुठून आली, याची कोणालाच माहिती नव्हती. मुंबईत आल्यानंतर जवळपास वर्षभर तिने रस्त्यावर आपले जीवन काढले. १३ जुलै २०२१ रोजी ती महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांना दहिसर कांदरपाडा येथे निराधार अवस्थेत सापडली. पोलिस निरीक्षक संदीप साळवे यांच्या शिफारशीनंतर महिला पोलिस अधिकारी सुनीता पुजारी यांनी तिला विरार फाटा येथील ‘जीवन आनंद’ संस्थेत दाखल केले; परंतु तस्लिमाला इतर भाषा येत नसल्याने तिच्याशी संवाद साधण्यात अडचणी येत होत्या. यावरही मार्ग निघाला. संस्थेतील समुपदेशक आदिती मून या बंगाली भाषिक असल्याने त्यांनी तस्लिमाला बोलते करून तिची माहिती काढण्यात यश मिळविले.

किसन चौरे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून तस्लिमाच्या गावातील सरपंच आणि आमदारांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला आणि अखेर तस्लिमाच्या घरचा पत्ता मिळाला. २३ ऑगस्टला रात्री तस्लिमा आणि तिच्या नातेवाईकांचा व्हिडीओ संवाद करून देण्यात आला. यावेळी तिचा भाऊ, भावजय आणि पुतणी तिच्याशी बोलले. त्यानंतर तिच्या भावाने तिचा रितसर ताबा घेतला. जवळपास दोन वर्षे नातेवाईकांपासून लांब राहत निर्धाराचे जीवन जगणाऱ्या तस्लिमाला अखेर आपले कुटुंबीय मिळाले. ‘जीवन आनंद’ संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण, संदीप परब, विरार येथील दर्ग्याचे मुजावर समशेरअली शेख, अयुब माजगावकर, मोहम्मद हाफिज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर, उपनिरीक्षक बशीर शेख यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96272 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :virar