निर्माल्यातून बहरणार हिरवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माल्यातून बहरणार हिरवाई
निर्माल्यातून बहरणार हिरवाई

निर्माल्यातून बहरणार हिरवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १० : बाप्पाचा थाट मोठा... नाही उत्साहाला तोटा... कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या उत्साहातही ठाणेकरांनी पर्यावरणाशी जुळलेले नाते कायम ठेवले असून त्यांनी दान केलेल्या निर्माल्यातून हिरवाई बहरणार आहे. यावर्षी संकलित झालेल्या ४७ टन निर्माल्यापासून खतनिर्मितीला सुरुवात झाली असून, ठाणे महापालिकेच्या उद्यानांमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्याने गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्राला दिली. त्यामुळे गणपती काळात तलाव, नदी, खाड्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले. याचे पुढचे पाऊल म्हणून २०१५ पासून ठाणे महापालिकेने ‘समर्थ भारत’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने निर्माल्य संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा नवीन संकल्प हाती घेतला. या संकल्पाला आता एक तप पूर्ण होणार आहे. ही तपपूर्ती पूर्ण होताना दरवर्षी गणेशोत्सवात संकलित होणाऱ्या निर्माल्यामध्ये मोठी घट झाली असल्याने या अभियानाचे हे मोठे यशच म्हणावे लागले.

निर्माल्यात ५० टक्के घट
दरवर्षी १०० टनापेक्षा जास्त निर्माल्य संकलित होते. कोरोना काळातही त्यावर फारसा परिणाम जाणवला नाही; पण कोरोनाने निसर्गाशी नाळ पुन्हा जोडल्याने यावर्षी कमीत कमी निर्माल्य जमा होईल याची काळजी भक्तांनी घेतली आहे. अर्थात याला महागाईनेही ‘हातभार’ लावला आहे. फुलांचा भाव वाढल्याने बहुतेकांनी पुष्प सजावटीला बगल दिली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी गणेश विसर्जन काळात निर्माल्यात ५० टक्के घट झाली आहे. यंदा ४७ टन निर्माल्य ठाणे महानगरपालिका आणि ‘समर्थ भारत व्यासपीठ’ यांच्याकडे प्राप्त झाले आहे.

असे तयार होते खत
महापालिकेच्या सात विसर्जन घाटांमधून हे निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. यामध्‍ये रायलादेवी २, उपवन, मासुंदा तलाव, कोपरी, आंबे घोसाळे आणि कळवा अशा विसर्जन घाटांचा समावेश आहे. या घाटांवर ठेवण्यात आलेल्या वाहनांमध्ये जैविक व अजैविक कचरा वेगळा केला जातो. यामध्ये निर्माल्याचाही समावेश असतो. वेगळा केलेला कचरा ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या कोपरी येथील संयुक्त कचरा व्यवस्थापनाकडे पाठवला जातो. सर्वप्रथम या निर्माल्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्‍यानंतर यंत्राच्या साह्याने त्याचा चुरा करून तो बायो कल्चरनुसार प्रक्रिया करून खतनिर्मिती होते. यंदा ४७ टन निर्माल्यापासून १० ते १२ हजार किलो खत तयार केले जाणार आहे. हे खत ठाणे महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती ‘समर्थ भारत’चे भट्टू सावंत यांनी दिली.

यावर्षी संकलन करण्यात आलेले निर्माल्य
पहिल्या दिवशी १० टन
पाचव्या दिवशी ८ टन
सातव्या दिवशी १२ टन
दहाव्या दिवशी १७ टन

देखाव्यांमधून थर्माकोल हद्दपार
यावर्षी ठाणेकरांनी गणेशोत्सवात देखाव्यासाठी थर्माकोल, प्लास्टिक, फ्‍लेक्स यांसारख्या अविघटनशील पदार्थांचा वापर कमी केल्याचे आढळून आले. म्हणूनच नेहमी निर्माल्यात सर्वाधिक डोकावणाऱ्या थर्माकोलचे प्रमाण यंदा ९८ टक्क्यांनी घटले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरही पर्यावरणाच्या दिशेने
कल्याण-ठाण्यात निर्माल्य संकलनात घट झाली असताना कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात मात्र यावर्षी दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे. गेल्या वर्षी ७५ टन निर्माल्य, तर यंदा १७९ टन निर्माल्य गोळा झाले आहे. जनजागृतीमुळे गणेशभक्तांनी यावर्षी निर्माल्याचे विसर्जन न करता ते संकलन केंद्रात जमा केल्याने यावर्षी १०० टन जादा निर्माल्य गोळा झाले आहे. त्याचे सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे नदी व खाडीमध्ये होणाऱ्या प्रदूषणात घट झाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, संकलित झालेले निर्माल्य डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान, गोखले हॉस्पिटल शेजारी एमआयडीसी येथील खत प्रकल्पास व आयरे, कचोरे आणि उंबर्डे बायोगॅस प्रकल्प येथे देण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96297 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..