लेडी सिंघमला शाबासकी थाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेडी सिंघमला शाबासकी थाप
लेडी सिंघमला शाबासकी थाप

लेडी सिंघमला शाबासकी थाप

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. १७ ः केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत गुन्हे प्रकटीकरणासाठी देशभरातील पोलिस उपनिरीक्षक ते महासंचालक या पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. या अनुषंगाने २०२२ च्या केंद्रीय गृहमंत्री मेडलसाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हे शाखेत सहायक पोलिस निरीक्षकपदी काम करणाऱ्या राणी काळे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशभरातून फक्त दोनच महिला पोलिसांची निवड करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाचे राणी काळे यांच्यामुळे कौतूक होत आहे.
-------------------------
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राणी काळे यांना बालपणापासून खाकी वर्दीची आवड होती. त्यामुळे मोठेपणी ध्येय गाठण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश गाठण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली होती. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा पास होताना महाराष्ट्रामध्ये मुलीमधून पहिला, तर संपूर्ण राज्यातून आठवा क्रमांक पटकावत त्यांनी पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न जिद्दीने साकाराले होते. पुणे येथील वानवडी पोलिस स्टेशनमधून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून स्वतःच्या करिअरची सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी तक्रार पेट्या लावण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी केला. जून २०१६ मध्ये नवी मुंबई पोलिस दलामध्ये रुजू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची लेडी सिंघमच्या उपाधीला वाव मिळाला. नवी मुंबई पोलिस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकामध्ये काम करत असताना ड्रग्समाफियांना राणी काळे यांनी ‘सळो की पळो’ करून सोडले होते. कर्तव्य बजावताना आत्तापर्यंत जवळपास ५० वेळा यशस्वी सापळे रचून सिनेस्टाईलने थरारकरीत्या अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळेच नवी मुंबई परिसरातील ड्रग्सविक्रेत्यांना जरब बसली आहे. याशिवाय शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरील शेकडो व्याख्यानातून प्रबोधनाचे काम केले आहे.
--------------------------
कर्तृत्वाला घरच्यांचे पाठबळ
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये राणी यांच्या कामामुळे लेडी सिंघम म्हणून ख्याती आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या सेवेत पोलिस आयुक्तालयाकडून दिली जाणारी ३० पारितोषिके व विशेष उल्लेखनीय कार्यासाठी जवळपास २० च्या वर पारितोषिक देऊन सन्मान झाला आहे. याशिवाय खासगी सामाजिक संस्थांची शेकडोच्या वर पारितोषिक मिळाली आहेत. यासाठी पोलिस दलात कार्यरत असलेले त्यांचे पती सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा गोरे यांचा पाठिंबादेखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96312 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..