पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन
पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : पोखरण अणुचाचणी प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे वयाच्या ५९ वर्षी वाशीतील फोर्टीस रुग्णालयात दुःखद निधन झाले. गेल्या महिन्याच्या प्रारंभी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मेंदूसंसर्ग झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात होते. अखेर त्यांचा रक्तदाब घटत जाऊन ८ सप्टेंबरला सकाळी ८.५५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह शुक्रवारी (ता. ९) सकाळी त्यांच्या जुईनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या संवर्धिनी आणि संतृप्ती यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्रातील पीआयईडी विभागाचे प्रमुख, अणूशास्त्रज्ञ डॉ. परितोष पी. नाणेकर, सेक्शन हेड अणूशास्त्रज्ञ बी. एन. रथ, अणूशास्त्रज्ञ अश्विनीकुमार, तपनकुमार असेच अन्य वैज्ञानिक अधिकारी, अणूतंत्रज्ञ अतुल लिखिते, पुरुषोत्तम कोंडेस्कर, संजय धर्माधिकारी, शैलेश मातवणकर, सुरजकुमार, त्रिपाठी, साहू, राजेश जाधव, आर. सी. विश्वकर्मा, नरेश व अन्य मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दिवंगत संजय चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, २ अविवाहित कन्या, २ भाऊ, ४ बहिणी व त्यांचे कुटुंबीय, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

--------------------------------------

संजय चव्हाण यांच्याविषयी माहिती
संजय चव्हाण हे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) सन १९८२ मध्ये रुजू झाले. अणुभट्टीच्या इंधनाच्या निर्मिती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रेडिओ मेटलर्जी डिव्हिजनमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. अभियांत्रिकी अभियंता पदविकाधारक असलेल्या चव्हाण यांचा रेडिओ मेटलर्जीतही हातखंडा होता. संजय चव्हाण यांच्या बीएआरसीतील कर्तृत्वाचा कळस म्हणजे १९९८ च्या पोखरण अणुचाचणीच्या (ऑपरेशन शक्ती २) प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. मात्र प्रसिद्धीपासून ते कटाक्षाने दूर राहिले.

संजय चव्हाण यांचा वेद, उपनिषद पुराणे व इतर संस्कृत व प्राकृत धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास होता. वारकरी संप्रदायाशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ज्येष्ठ प्रवचन, कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्याशी त्यांचे सुसंबंध राहिले. विशेष म्हणजे त्यांनी दिव्य कुराणचीही पारायणे केली होती. त्यासाठी अरेबिक भाषेचे शिक्षण घेतले होते. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेकदा बौद्ध सांप्रदायिक विपश्यना साधना केली होती.योगसाधना, व्यायाम, गिरिसंचार, सायकलिंग यात त्यांना विशेष रस होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96352 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..