नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार
नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार

sakal_logo
By

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार
प्रवाशांसह नागरिक त्रस्त ः नियोजनाअभावी शौचालये, पाणपोई बंद अवस्थेत


वाशी, ता. ११ (बातमीदार) ः ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ऐरोली रेल्वेस्थानक अनेक समस्यांनी गुरफटलेले आहे. त्याचा त्रास येथील प्रवाशांसह नोकरदारवर्गाला सहन करावा लागत आहे. ऐरोली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असणाऱ्या आयटी पार्कमध्ये मुंबई तसेच उपनगरामधील नागरिक कामासाठी येतात. त्यांनादेखील येथील समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐरोलीमधील रहिवासी वसाहतीमधूनदेखील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी बाहेर जात असतात. त्यांनादेखील या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही अलिशान रेल्वेस्थानके समस्यांची आगार बनली आहेत.
ऐरोली रेल्वे स्थानकातील अनेक ठिकाणी छत लिकेज असल्याने प्रवाशांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐरोली रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा देण्याचे बॉक्स बसविण्यात आले आहे; मात्र अद्यापही वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. ऐरोली रेल्वे स्थानकात ठाणे-बेलापूर मार्गाच्या दिशेने असणाऱ्या तिकीट खिडक्या या बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना पश्चिमेच्या बाजूस येऊन तिकीट काढावे लागत असल्याने ठाणे बेलापूर मार्गाच्या बाजूस असणाऱ्या झोपडपट्टीमधील नागरिकांना यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या तिकीट खिडक्या सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांनी आजी-माजी खासदारांकडे केली; पण ही मागणी पूर्ण करण्यात अपयश आले आहे. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सिडकोकडून भाडेतत्त्वावर देण्यासाठी गाळे बांधण्यात आले आहेत; पण हे गाळे कधी सुरूच झाले नाहीत. ऐरोली रेल्वे स्थानकांच्या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची अवस्था नकोशी झाली असून फक्त एकच पे अ‍ॅण्ड युज शौचालय सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकात पाणपोईची अवस्था दयनीय झाली असून दोन वर्षांपूर्वी आणलेले वॉटर कुलर सुरू न केल्याने अद्यापही धूळ खात पडून आहेत. सिडकोकडून फलाटांची दररोजची साफसफाई होत नाही. त्यामुळे फलाटांवर कचरा साचलेला असतो; तर कचरा कुंड्यादेखील गायब आहेत. ऐरोली रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी असणारी आसन व्यवस्थादेखील तोकडी आहे. ती वाढवण्याची मागणीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आसनव्यवस्था कमी असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत रेल्वेची वाट बघावी लागत आहे. इंडिकेटर हे लहान आकारांचे बसवण्यात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून स्टेशनची साधी रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळेला स्टेशन परिसरात दिवे बंद असल्यामुळे प्रवाशांना यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चौकट
रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षाचालकांचा वेढा
ऐरोली रेल्वे स्थानकांच्या पूर्व व पश्चिमेस दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांवर रिक्षाचालकांनी वेढा घातलेली परिस्थिती असते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात येताना कसरत करावी लागते. सकाळ संध्याकाळच्या वेळी तर रिक्षाचालकांच्या होणाऱ्या मनमानीलादेखील सामोरे जावे लागते. रिक्षाचालक अस्ताव्यस्त पद्धतीने रिक्षा पार्क करतात. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

चौकट
पार्किंग प्लाझामध्ये बेवारस वाहने
ऐरोली रेल्वे स्थानकांच्या पे अ‍ॅड पार्कमध्ये बेवारसपणे वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली आहेत. तसेच पार्किंग प्लाझाच्या बाहेरदेखील वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांनादेखील यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका खासगी कंपनीच्या बसेस एका ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहन पार्क करता येत नाही. रात्रीच्या वेळेला नियमबाह्यपणे स्टेशन परिसरात खासगी कंपन्यांच्या बसेस आणि केमिकलचा ट्रक पार्क केला जातो.

कोट
रेल्वे स्थानकांमधील प्लॅटफॉर्मवरून कचरा दिसून येतो. तसेच पश्चिमेच्या बाजूस असणाऱ्या शौचालयामध्ये साफसफाई होत नाही. त्यामुळे नाक मुठीत धरून जावे लागते. रेल्वे स्थानकांच्या पश्चिमेस तिकीट खिडकी नसल्यामुळे पूर्वेच्या बाजूस येऊन तिकीट काढावे लागते; तर रेल्वे स्थानकांच्या बाहेर रिक्षाचालक अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क करत असल्यामुळे त्यामधून प्रवास करावा लागत आहे.
- दिलीप बिऱ्हाडे, प्रवासी

कोट
ऐरोली रेल्वे स्थानकांमध्ये साफसफाई होत नसल्यास त्यांची पाहणी करून त्या ठिकाणी तत्काळ स्वच्छता करण्यात येईल. पार्किंगमध्येदेखील बेवारस वाहने असल्यास ती वाहने हटवण्यात येतील.
- मिलिंद रावराणे, अभियंता, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96365 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..