महिलेची जंगलातच प्रसुती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेची जंगलातच प्रसुती
महिलेची जंगलातच प्रसुती

महिलेची जंगलातच प्रसुती

sakal_logo
By

जव्हार, ता. ११ (बातमीदार) ः तालुक्यातील मनमोहाडी येथील महिलेची जंगलातच प्रसुती झाल्याचा प्रकार रविवारी (ता.११) पहाटे घडला आहे. जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी या महिलेला डोलीतून नेले जात होते. परंतु, अर्ध्या वाटेतच महिलेची प्रसुती झाली. नंतर तिला जव्हार येथी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रस्ता आणि वैद्यकीय सेवेअभावी बाळ दगावण्याच्या घटना जिल्ह्यात याआधी घडलेल्या आहेत. तरीही रस्ता दुरुस्ती करण्याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. यामुळे महिलांची प्रसुती ही जिवावरचा खेळ झाली आहे.

मनमोहाडी गावातील अंजली राजेश पारधी (वय २१) रविवारी पाहाटेच प्रसवकळा सुरू झाल्या. त्यांना जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेणे आवश्यक होते. पण, गावाला पक्का रस्ता नसल्याने दळवळणाचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे नातेवाईकानी गरोदर महिलेला डोलीत बसवून नेण्याची व्यवस्था केली. पण, हा रस्ता जवळपास पाच किमीचा आहे. तसेच, पहाटेची वेळ असताना सर्वत्र काळोख होताच. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्याआधीच अर्ध्या रस्त्यातच अंजली यांची प्रसुती झाली. त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांना बाळासह रुग्णालयात नेण्यात आले.

हा भाग अतिशय दुर्गम असून पक्क्या रस्त्याची येथे वाणवा आहे. जव्हारला जायचे असेल तर दळणवळणाची साधने नाहीत. गरोदर माता, सर्पदंश झालेले रुग्ण किंवा इतर आजार असेलले तातडीच्या उपचाराची गरज असलेले रुग्ण यांना जव्हारला नेणे ही तारेवरची कसरत आहे. पण, तरीही शासन, प्रशासन स्तरावर याची दखल घेतली जात नाही. कुठलाही पक्ष पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नसल्याची तक्रार नागिरक करत आहेत. दरम्यान, जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातून गरोदर मातांना वेळेवर उपचार मिळावा आणि सकस आहार प्राप्त व्हावा यासाठी आरोग्य विभागातून माहेर घर उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु, तालुका आरोग्य विभागाच्या वतीने माहेरघर उपक्रमाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. अधिक प्रभावीपणे जनजागृती झाल्यास माता व नवजात अर्भकाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकेल.
------
रविवारी पहाटे अंजली राजेश पारधी या प्रसूत महिला व त्यांची कन्या यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माता व नवजात अर्भक या दोहोंची प्रकृती चांगली आहे.
- डॉ.रामदास मराड , वैद्यकीय अधीक्षक
------
या रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. शासनाकडून फॉरेस्ट परवानगीमुळे निधी देता येत नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु आता आम्ही ३/२ च्या प्रस्तावानुसार फॉरेस्टची परवानगी घेतली आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व निधी उपलब्ध करून द्यावा. अजून किती पेशंट मरण्याची शासन वाट पाहत आहे.
- एकनाथ दरोडा, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी, जव्हार तालुका
-------
जव्हारमधील दुर्गम भागात रस्ते नसल्याने अशा घटना नेहमी होत असतात. अशा घटना होऊ नये म्हणून या अगोदरही आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. संबंधित घटनेविषयी अधिक माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यात येईल.
- वैदेही वाढाण, अध्यक्षा, पालघर जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96433 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..