वांद्र्यात भरला सर्वधर्मीयांचा मेळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्र्यात भरला सर्वधर्मीयांचा मेळा!
वांद्र्यात भरला सर्वधर्मीयांचा मेळा!

वांद्र्यात भरला सर्वधर्मीयांचा मेळा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर मुंबईतील पारंपरिक आणि ऐतिहासिक अशा ‘माऊंट मेरी’ जत्रेला रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मारिया आईचे दर्शन घेण्यासाठी वांद्र्यातील माऊंट मेरी बॅसिलिका चर्चमध्ये सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती. सर्वधर्मीय बांधवांचा मेळाच जणू भरला होता. रात्री उशिरापर्यंत ७० ते ८० हजार भाविक जत्रेत सहभागी होतील, अशी माहिती चर्च प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे ‘माऊंट मेरी’ची जत्रा होऊ शकली नव्हती. यंदा कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आल्याने ११ ते १८ सप्टेंबरदरम्यान जत्रा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी माऊंट मेरीचे आशीर्वाद घेण्यासाठी चर्चला भेट दिली. अनेक भाविकांनी चर्चमध्ये मेणबत्ती पेटवत सुख, शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभावी म्हणून माऊंट मेरी आईला साकडे घातले.

भाविकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे जत्रेदरम्यान वांद्रे रेल्वेस्थानक आणि हिल रोड गार्डनदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची सोय झाली आहेत. माऊंट मेरी जत्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला होता. मध्य आणि हार्बर मार्गावर मात्र मेगाब्लॉक असल्याने जत्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.

देशभरातून भाविकांची हजेरी
जत्रेला केवळ ख्रिश्चनच नव्हे; तर सर्व धर्मांचे नागरिक वांद्र्यात दाखल होतात. विशेष म्हणजे, देशभरातील ख्रिश्चन समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात चर्चला भेट देतात. दोन वर्षांपासून माऊंट मेरीची जत्रा झाली नसल्याने यंदा येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रविवार दुपारपर्यंत जवळजवळ ५० हजार भाविक चर्चला भेट देऊन गेले, असे वॉचडॉग फाऊंडेशतर्फे सांगण्यात आले.

मेणबत्ती विक्री सुसाट
माऊंट मेरी जत्रेमुळे माऊंट मेरी बॅसिलिका चर्च परिसरात विविध आकार आणि रंगांच्या मेणबत्त्या, फुले, कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, दागदागिने आणि खेळण्यांची दुकाने सजली आहेत. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. विशेष म्हणजे माऊंट मेरीच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या खरेदी करत आहेत. कोरोनामुळे विविध आकारांच्या मेणबत्या २० ते ३० टक्क्यांनी महाग झालेल्या असल्या, तरी नागरिक मोठ्या उत्साहात त्यांची खरेदी करत असल्याची माहिती विक्रेता इव्हेंटा डायस यांनी दिली.

दोन वर्षांनंतर यंदा मारिया आईचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचा आनंद आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा जत्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांपासून मुंबईतील पारंपरिक माऊंट मेरी जत्रा होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भाविक चर्चला भेट देत आहेत. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ५० हजार भाविकांनी भेट दिली. रात्रीपर्यंत भाविकांची संख्या लाखाच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे.
- अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाऊंडेशन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96463 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..