नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार
नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके समस्यांचे आगार

sakal_logo
By

नवी मुंबईतील रेल्वेस्थानके समस्यांचे आगार
प्रवाशांसह नागरिक त्रस्त ः नियोजनाअभावी शौचालये, पाणपोई बंद अवस्थेत

वाशी, ता. ११ (बातमीदार) ः कोणे एके काळी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके म्हणजे शान होती. दमले-भागलेला प्रवासी स्थानकात येताच हरखून जायचा. नवी मुंबई मेट्रो सिटीतील अद्ययावत सुविधा आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली ही स्थानके सध्या मात्र समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ऐरोली स्थानकात आज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी प्रवाशांसह नोकरदारवर्ग संताप व्यक्त करत आहेत.
ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ठाणे-बेलापूर मार्गाला लागूनच आयटी पार्क आहे. मुंबई आणि उपनगरामधील अनेक नोकरदार तिथे कामासाठी येतात. त्यांना स्थानकातील समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐरोलीतील रहिवासी वसाहतीमधूनही अनेक नागरिक कामानिमित्त आणि शिक्षणासाठी बाहेर जात असतात. स्थानकातील दुरवस्थेबाबतच्या त्यांच्या तक्रारीही आता वाढू लागल्या आहेत. साहजिकच सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली आलिशान रेल्वेस्थानके समस्यांचे आगार बनली आहेत.

काय आहेत समस्या?
- अनेक ठिकाणी छतांना गळती असल्याने प्रवाशांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागतो.
- स्थानकात वायफायसाठी बॉक्स बसविण्यात आले; परंतु अद्याप ती सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.
- ठाणे-बेलापूर मार्गाच्या दिशेने असणाऱ्या तिकीट खिडक्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना पश्चिमेला जाऊन तिकीट काढावे लागते. तिकीट खिडक्या सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित. आजी-माजी खासदारांकडे मागणी करूनही अपयश.
- स्थानकाच्या पूर्वेस सिडकोकडून भाडेतत्त्वावर देण्यासाठी गाळे बांधण्यात आले; पण ते कधी सुरूच झाले नाहीत.
- स्थानकांच्या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची दुरवस्था. फक्त एकच पे अ‍ॅण्ड युज शौचालय सुरू आहे.
- पाणपोईची अवस्था दयनीय. दोन वर्षांपूर्वी आणलेले वॉटर कुलर सुरू न केल्याने अद्याप धूळ खात पडून.

फलाटांवर कचरा
एरोली स्थानकात सिडकोकडून फलाटांची दररोजची साफसफाई होत नाही. त्यामुळे फलाटांवर कचरा साचलेला असतो. कचरा कुंड्याही गायब आहेत. फलाटांवर प्रवाशांना बसण्यासाठी असणारी आसन व्यवस्थाही तोकडी आहे. ती वाढवण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आसनव्यवस्था कमी असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत लोकलची वाट पाहावी लागते. इंडिकेटर लहान आकारांचे असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून स्थानकाची रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. रात्री स्थानक परिसरात दिवे बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.


रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालकांचा वेढा
ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पूर्व व पश्चिमेस दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारांवर रिक्षाचालकांनी वेढा घातलेली परिस्थिती असते. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात येताना कसरत करावी लागते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी तर रिक्षाचालकांच्या होणाऱ्या मनमानीलाही सामोरे जावे लागते. रिक्षाचालक अस्ताव्यस्त पद्धतीने रिक्षा पार्क करतात. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

पार्किंग प्लाझामध्ये बेवारस वाहने
ऐरोली रेल्वे स्थानकाच्या पे अ‍ॅड पार्कमध्ये बेवारसपणे वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली आहेत. पार्किंग प्लाझाच्या बाहेरही वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका खासगी कंपनीच्या बस एका ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहन पार्क करता येत नाही. रात्रीच्या वेळेला नियमबाह्यपणे स्थानक परिसरात खासगी कंपन्यांच्या बस आणि रसायनांचा ट्रक पार्क केला जातो.

कोट
रेल्वेस्थानकामधील फलाटावर कचरा असतो. पश्चिमेच्या बाजूस असणाऱ्या शौचालयामध्ये साफसफाई होत नसल्याने नाक मुठीत धरून जावे लागते. स्थानकाच्या पश्चिमेस तिकीट खिडकी नसल्यामुळे पूर्वेच्या बाजूस येऊन तिकीट काढावे लागते. स्थानकाबाहेर रिक्षाचालक अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क करत असल्यामुळे त्यामधून प्रवास करावा लागत आहे.
- दिलीप बिऱ्हाडे, प्रवासी

कोट
ऐरोली स्थानकामध्ये साफसफाई होत नसल्यास त्याची पाहणी करून तत्काळ स्वच्छता करण्यात येईल. पार्किंगमध्येही बेवारस वाहने असल्यास ती हटवण्यात येतील.
- मिलिंद रावराणे, अभियंता, सिडको

लोकल आणि स्थानकांशी प्रवाशांचे नाते
मुंबईतील नोकरदारवर्गाचे अर्धे आयुष्य लोकलच्या डब्यात जाते, असे म्हणतात. त्याला कारणही आहे. प्रवासाच्या दृष्टीने तुलनेने स्वस्त आणि जलद पर्याय असलेल्या लोकलशी मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. साहजिकच रेल्वे प्रशासनातर्फे काही आगळीक झाली, तर प्रवासी तत्काळ नाराजी व्यक्त करतात. लोकलचा खोळंबा झाली किंवा रेल्वेशी निगडित काही समस्या दिसल्या तर संताप व्यक्त करतात. लोकल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्यांचे तिच्याशी आणि स्थानकांशी अनोखे नाते जुळून आलेले आहे. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने त्यांच्या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96479 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..