मिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज
मिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज

मिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज

sakal_logo
By

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराच्या वाढीची मर्यादा लक्षात घेता या ठिकाणच्या रहिवासी क्षेत्रावर निर्बंध येण्याची गरज आहे. तसेच नव्या विकास आराखड्यात आयटी पार्क व इलेक्ट्रॉनिक पार्कसारख्या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या उद्योगांचे आरक्षण समाविष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे शहराच्या नव्याने तयार होत असलेल्या विकास आराखड्यात त्याची तरतूद व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिरा-भाईंदरच्या पहिल्या विकास आराखड्याची मुदत २०१७ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यानंतर नव्या विकास आराखड्याचे काम सुरू झाले आहे; मात्र गेली पाच वर्षे ते रखडले आहे. आता पुन्हा एकदा आराखड्याच्या कामाला वेग आला आहे. यासंदर्भात मध्यंतरी सूचनादेखील मागवण्यात आल्या होत्या. नव्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ न करता बेंगळूरु व पुणे शहराच्या धर्तीवर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशा इलेक्ट्रॉनिक पार्क, आयटी पार्कसारखी आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अजित पाटील यांनी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहराच्या तीन बाजूला खाडी व समुद्र आहे; तर एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. शहराचा बराचसा भाग सीआरझेड व ना विकास क्षेत्रातही मोडत आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी क्षेत्राला मर्यादा आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक यासारख्या प्राथमिक सोयी-सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. नव्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसंख्येत आणखी भर पडणार असून उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असलेल्या शहराला हा ताण सहन न होण्यासारखा आहे. सध्या मिरा-भाईंदरमधील नोकरदार वर्ग मुंबईवर अवलंबून आहे. कामानिमित्त दररोज मिरा-भाईंदर ते मुंबई असा प्रवास त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे नव्या विकास आराखड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी आरक्षणे समाविष्ट केल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे अजित पाटील यांचे म्हणणे आहे.
...
भूमिपुत्रांशी समन्वय साधणे गरजेचे
पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती होत्या. परंतु काळाच्या ओघात येथील उद्योगात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आयटी अथवा इलेक्ट्रॉनिक पार्कसारखी प्रदूषणविरहित उद्योग वसाहत या ठिकाणी निर्माण झाली; तर तरुणांना रोजगारही मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे. सरकारचे उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांशी समन्वय साधून या वसाहती निर्माण करणे शक्य आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96555 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..