बदलापूर एसी लोकलसाठी रेल्वेचा हट्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूर एसी लोकलसाठी रेल्वेचा हट्ट
बदलापूर एसी लोकलसाठी रेल्वेचा हट्ट

बदलापूर एसी लोकलसाठी रेल्वेचा हट्ट

sakal_logo
By

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : आंदोलनानंतर बंद पडलेली बदलापूर एसी लोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी थेट बदलापूरकर प्रवाशांकडूनच हरकती, सूचना मागवत एसी लोकल हवी की नको, असा प्रश्न सूचना फलकाच्या माध्यमातून विचारण्‍यात आला आहे. या हरकतींचा विचार करून पुढील निर्णय घेणार, असे तूर्तास सांगण्यात येत असले तरी बदलापूर एसी लोकलचा हट्ट सोडण्यास रेल्वे प्रशासन तयार नसल्याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रवाशांना गारेगार प्रवास देणाऱ्या वातानुकूलित लोकलला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नुकताच रेल्वे प्रशासनाकडून करण्‍यात आला आहे. गर्दीच्यावेळी एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांचा खोळंबा होत असल्याने आता मोठ्या प्रमाणात विरोध वाढला आहे. गेल्या महिन्यात याच वादातून कळव्यात आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर लगेचच बदलापूरमध्येही एसी लोकलला विरोध दर्शवण्यात आला. आधीच लोकलची संख्या कमी असताना ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळीच साध्या लोकल रद्द करून, त्या जागी या लोकल चालवण्यात येत असल्याने बदलापूरकर प्रवाशांनी बदलापूर रेल्वेस्थानकात सलग तीन दिवस आंदोलन करत, स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता. या आंदोलनाचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने नमते घेत, २४ ऑगस्ट रोजी एसी लोकल रद्द करून पुन्हा साधी लोकल सुरू केली. मात्र या एसी लोकल पुन्हा बदलापूरकरांच्या माथी मारण्यासाठी आता प्रशासन सरसावले आहे.

प्रवाशांच्या उद्रेकानंतर रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निणर्याला १८ दिवस उलटल्यावर आता, रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वेस्थानकात एक सूचना लावली आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाला पुन्हा एसी लोकल सुरू करण्याची इच्छा असून याबाबत प्रवाशांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत आहे. एसी लोकलला सरसकट विरोध नाही; पण आधी या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेच्या कार्यकत्यांशी संपर्क केला असता त्यांनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दिल्या असल्याची माहिती दिली.

‘त्या’ अर्ध्‍या तासात एसी लोकल चालवा
मुळातच एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध नाही; पण साधी लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल सुरू करायला प्रवासी संघटनेचा विरोध कायम असेल. तसेच बदलापूर रेल्वेस्थानकात अनेकदा दोन लोकलमध्ये एक तास किंवा अर्ध्या तासाचे अंतर असते. रेल्वेला एसी लोकल सुरूच करायची असेल तर ‘त्या’ वेळेत गारेगार सेवा द्यावी, अशी मागणी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे रमेश महाजन यांनी केली आहे. याबाबत रेल्वेला सूचना सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------------------------
प्रवाशांची मते विचारात घेणार
रेल्वे प्रशासनाने अद्याप एसी लोकल सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. प्रशासन एसी लोकल सुरू करण्यास इच्छुक असून, या संदर्भात आम्हा प्रवाशांकडून त्यांच्या हरकती व सूचना घेणार आहोत. तसेच येत्या दोन दिवसांत या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सामान्य प्रवाशांचे मत विचारात घेऊनच या संदर्भात पाऊल उचलणार असल्याचे बदलापूर रेल्वे स्थानकाचे मुख्य स्थानक प्रबंधक एस. बी. सिंग यांनी सांगितले.
-------------------------------------
एसी लोकलला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या खिशाला परवडणाऱ्या साध्या लोकल आम्हाला गर्दीच्या वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, त्यावेळी एसी लोकल आम्हाला नको. तसेच रेल्वे प्रशासनाने एसी लोकलचे दर कमी करावेत, जेणेकरून सामान्य प्रवासी त्या लोकलने प्रवास करण्यास सुरुवात करतील.
- सागर कलशेट्टी
सामान्य प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96594 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..