पनवेलच्या रुग्णसेवेला बळकटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलच्या रुग्णसेवेला बळकटी
पनवेलच्या रुग्णसेवेला बळकटी

पनवेलच्या रुग्णसेवेला बळकटी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. १२ ः पनवेल ग्रामीण आणि महापालिका हद्दीतील वाढत्या रुग्णांचा भार सांभाळण्यासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ही २०० खाटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन संकपाल यांनी जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सकांमार्फत राज्य आरोग्य विभागाकडे पाठवला असून या माध्यमातून ग्रामीण भागातील नव्याने वसलेल्या वसाहती आणि सिडको वसाहतींमधील आरोग्य सेवेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पनवेलकरांना सवलतीच्या दरात सुविधा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सोडले तर एकही सरकारी रुग्णालय नाही. पनवेल महापालिकेचेही स्वतःच्या मालकीचे रुग्णालय नाही. अशा परिस्थितीत पनवेल शहर आणि महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमधील गरीब-गरुजूंना उपजिल्हा रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते; परंतु उपजिल्हा रुग्णालयातील १२० खाटा रुग्णांच्या प्रमाणासमोर कमी पडत असल्याने अनेकदा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्याचा गैरफायदा घेत रुग्णांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. अशातच पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना इतर आजारांवरील वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविडकाळातही पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाचा नागरिकांना मोठा आधार ठरला होता. कोविडच्या तीनही लाटांमध्ये या रुग्णालयातून साडेपाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे भविष्यात या रुग्णालयावरील वाढता भार लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाकडून अतिरिक्त २०० खाटांचा प्रस्ताव राज्य आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
-़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
अतिरिक्त सुविधा देण्यासाठी उपयुक्त
या रुग्णालयातील शंभर खाटांच्या भरवशावर महिन्याला ७० ते ८० प्रसूती होतात. त्यापैकी १२ सिझेरियन असतात. सध्या रुग्णालयातील १२० खाटांपैकी १०० खाटा सामान्य रुग्णांना, तर २० खाटा अपघात कक्षासाठी वापरल्या जातात. रुग्णालयात सध्या प्रसूती व शस्त्रक्रिया, नसबंदी, लहान मुलांवरील हार्निया आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु आता डॉक्टर नसल्याने गेले सहा महिने हाडावरील उपचार थांबले आहेत. तसेच दररोज १० ते १२ रुग्णांचे डायलिसिस होते. त्यामुळे रुग्णालयात अतिरिक्त २०० खाटांची व्यवस्था झाल्यास रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि पॅरामेडीकल्स स्टाफची अतिरिक्त फौज देखील उपलब्ध होणार आहे.
--------------------------------------
महामार्गावरील अपघातांचा मोठा भार
पनवेल महापालिका हद्दीतून सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पळस्पे ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग असे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि दोन राज्य महामार्ग जातात. राज्यातील सर्वात व्यस्त असणाऱ्या रस्त्यांपैकी हे रस्ते असल्यामुळे दिवसाआड अपघाताच्या घटना घडतात. महिन्याला ६० ते ७० अपघातग्रस्त रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात येतात. त्यामुळे मयतांचे पोस्टमार्टम करण्यासाठीही उपजिल्हा रुग्णालय हाच पर्याय आहे.
---------------------------------------
अपंगांचे प्रमाणपत्र
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर २०२१ पासून अपंगांचे प्रमाणिकरण करून प्रमाणपत्र देण्याचे शिबिर आयोजित केले जाते. आतापर्यंत ७५० पेक्षा जास्त अपंगांना प्रमाणपत्र देऊन सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे.
----------------------------------------
पनवेल उपजिल्हा रुग्णालयातर्फे १२० खाटांच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जातात. मात्र आता पनवेल शहराभोवती होणारा विकास आणि लोकसंख्या पाहता २०० खाटांपर्यंत क्षमता वाढवण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.
- डॉ. सचिन संकपाल, वैद्यकीय अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96595 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..