मानसरोवर बस स्थानकाला समस्यांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसरोवर बस स्थानकाला समस्यांचा विळखा
मानसरोवर बस स्थानकाला समस्यांचा विळखा

मानसरोवर बस स्थानकाला समस्यांचा विळखा

sakal_logo
By

कामोठे, ता. १२ (बातमीदार) : मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील एनएमएमटी बस स्थानकाला समस्यांनी वेढलेले आहे. कामोठे परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. येथून हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र, बस स्थानक परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव, बस सेवा सुरळीत मिळत नसल्यामुळे मानसरोवर ते रोडपाली या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. खांदेश्‍वर, मानसरोवर स्थानकाबाहेर सिडकोच्या गृहप्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती काही वर्षांत वाढणार आहे. सध्या मानसरोवर स्थानकाबाहेर असलेला थांबा या गृहप्रकल्पामुळे काही अंतरावर स्थलांतरीत केला आहे. मात्र, या स्थानकाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था नाही. काही ठिकाणी तर आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. प्रवाशांनी बससाठी उभे राहायचे म्हटले तर तेथील पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पुरेसा प्रमाणात उजेड नसल्याने प्रवासी अडकून पडले जात आहेत. रात्रीच्या वेळी तर अंधारामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते.
बस थांब्यावरील पत्र्याचे शेडची तुटलेले आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना पावसात भिजत उभे राहावे लागते. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. या ठिकाणी सुरक्षेच्या अभाव असल्यामुळे मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुले यांचा मुक्तपणे संचार असतो.
मानसरोवर ते रोडपाली मार्गावर धावणाऱ्या ५६ क्रमांकाच्या बसमधून दररोज सकाळी ७ ते रात्री १०.४० पर्यंत सुमारे ५० हजार प्रवासी वाहतूक होते. एनएमएमटीला दैनंदिन सरासरी ६५ हजारांचे उत्पन्न मिळते. एकूण पाच बस गाड्या १५ मिनिटांच्या अंतराने धावतात. दिवसभरात ८० फेऱ्या पूर्ण करतात. या बस सेवेचा कामोठे परिसरासह कळंबोली, एमजीएम, रोडपाली येथील रहिवाशांना मोठा आधार आहे. मानसरोवर रेल्वे स्थानक ते रोडपाली हे आठ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एका बसला सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे वेळेत वाढ होते.

गवतांची छाटणी करा
पावसामुळे स्थानकाभोवती गवत, झाडी-झुडपे वाढलेली आहेत. अशात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. किमान थांब्याभोवती असलेली झाडी-झुडपे आणि गवतांची छाटणी करण्यात यावीत, अशी मागणी प्रवासी करत आहे.

थांब्यासमोर वाहने उभी
बस थांब्यासमोरच अनेकदा वाहने उभी केलेली असतात. यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना अडचणी येतात. अशा अवैध पार्किंगवर आळा बसण्याची अत्यंत गरजेचे असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.

फेऱ्या सुरळीत करा
मानसरोवर ते नवी मुंबई पोलिस मुख्यालयापर्यंत ५६ क्रमांकाची बस धावते. काही दिवसांपासून ही सेवा सुरळीत नसल्यामुळे प्रवासी वर्ग नाराज आहेत. दोन फेऱ्यातील अंतर कमी करणे, सकाळी व संध्याकाळनंतर बसची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीचे कारण देत फेऱ्या रद्द केल्या जातात.

मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील एनएमएमटी बस स्थानकातील गैरसोयी दूर करण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. याबाबत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
- ए. बी. बैले, कार्यकारी अभियंता, रेल्वे विभाग सिडको

रात्रीच्या वेळी बस वेळेवर येत नाही. काही बस कर्मचारी सौजन्याने बोलत नाहीत. मागच्या बसने या, शेवटची बस आहे. माझी ड्युटी संपली आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.
- प्रसाद काळे, प्रवासी

मानसरोवर ते रोडपाली बस फेऱ्यांमध्ये वाढ झाली पाहिजे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी बस स्थानकात पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे.
- मानसी पवार, प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96598 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..