ठाणे पालिकेच्या हलगर्जीमुळे गेला महिलेचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या हलगर्जीमुळे गेला महिलेचा बळी
ठाणे पालिकेच्या हलगर्जीमुळे गेला महिलेचा बळी

ठाणे पालिकेच्या हलगर्जीमुळे गेला महिलेचा बळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १२ : बाप्पाच्या विसर्जनादिवशी गणेश मंडपावर झाड कोसळून एका महिलेचा हकनाक बळी गेला. मात्र या दुर्घटनेला ठाणे महापालिका प्रशासनही जबाबदार असल्याची धक्कादायक बाब समोर आली. मंडपावर कोसळलेले ते पिंपळाचे झाड धोकादायक स्थितीत असून त्याच्या फांद्या छाटण्यात याव्यात किंवा मुळापासून ते उपटण्यात यावे, असा विनंती अर्ज परिसरातील सोसायटीने वर्षभरात चार वेळा ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचे खासदार राजन विचारे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शुक्रवारी बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली. यावेळी ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच होत्या. याच दरम्यान कोलबाड जाग माता मंदिराजवळ असलेल्या कोलबाड मित्र मंडळाच्या मंडपात आरती सुरू असताना २५ वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत अर्पिता (राजश्री) वालावलकर या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चार जखमी झाले. झाड कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ठाण्यात वाढतच असल्याने याची दखल घेत खासदार राजन विचारे यांनी घटनास्थळी भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. या वेळी पालिकेचा हलगर्जीपणा उघडकीस आला. या धोकादायक झाडासंदर्भात सृष्टी को. ऑप. हौ. सोसायटीने ठाणे महापालिका आयुक्त व वरिष्ठ उद्यान वृक्ष अधिकारी यांच्‍याकडे चार वेळा अर्ज केले होते.
हे पिंपळाचे झाड उंच असल्याकारणाने झाडाच्या फांद्या सोसायटीला छाटणे आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे महापालिकेने या झाडाच्या फांद्या छाटाव्यात किंवा हे झाड निष्कासित करावे, अशी मागणी अर्जात केली होती. यापैकी पहिला अर्ज २४ मे २०२१, दुसरा अर्ज १२ जानेवारी २०२२, तिसरा अर्ज २४ मार्च २०२२, चौथा अर्ज ७ जुलै २०२२ रोजी करण्यात आला होता; परंतु ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पिंपळाचे झाड कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाच्या शेडवर पडून अर्पिता वालावलकर या महिलेला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यापूर्वी उदयनगर, पाचपाखाडी येथेही अशीच घटना घडली होती. सोसायटीने वारंवार पालिकेकडे तक्रार करूनसुद्धा महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सोसायटीच्या हद्दीत असणारे झाड कोसळून किशोर पवार (वय ४०) या व्यक्तीलाही प्राण गमवावा लागला होता.

३० लाखांची मदत द्या
झाड कोसळून मृत्यू झालेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्यात आली. त्यानुसार मंडपावर झाड कोसळून मृत्यू पावलेल्या अर्पिता वालावलकर यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ३० लाखांची मदत राज्य सरकारकडून मिळवून द्यावी. तसेच दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
-----------------------------------------
कोट
सोसायटीच्या आवारातील खासगी झाडे तोडण्याची कार्यवाही ठाणे पालिका करत नाही. ही जबाबदारी संबंधित सोसायटीची असते. त्यासाठी त्या सोसायटीने पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करायचा असतो. दुर्घटनाग्रस्त झाडाच्या फांद्या छाटण्यासंदर्भात अर्ज आला, तो पालिकेने मंजूरही केला होता.
- मारुती खोडके, उपायुक्त, पालिका मुख्यालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96600 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..