घणसोली स्थानकाला समस्यांचा घेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोली स्थानकाला समस्यांचा घेरा
घणसोली स्थानकाला समस्यांचा घेरा

घणसोली स्थानकाला समस्यांचा घेरा

sakal_logo
By

कोमल गायकर ः बातमीदार
घणसोली, ता. १२ ः ट्रान्स हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सुविधांनी परिपूर्ण असे रेल्वे स्थानक म्हणून कधीकाळी घणसोली स्थानक परिचित होते. मध्य रेल्वेवरील स्थानकापेक्षा हार्बर मार्गावरील हे स्थानक सुंदर आणि समस्यामुक्त होते. त्यामुळे या स्थानकाची नेहमीच चर्चा होत होती; मात्र सध्या सिडकोचे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या मनमानीमुळे घणसोली स्थानकालादेखील विविध समस्यांनी घेरल्याने सर्वसामान्यांचा प्रवास अडचणींचा झाला आहे.
----------------------------------------
स्थानकांची प्रवाशांना भुरळ
मुंबई आणि उपनगरात सुरक्षित असलेली वाहतूक सुविधा म्हणजे रेल्वे आहे. मुंबईपासून काही अंतरांवर असलेल्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सिडकोनिर्मित रेल्वे स्थानके शहराबाहेरून येणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भुरळ पाडतात. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल स्थान पटकावण्यात या स्थानकांचेदेखील योगदान होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या स्थानकांमधील समस्या आता अधिकच उठून दिसत आहेत.
-----------------------------------------------------
दुर्गंधीमुळे नाकीनऊ
घणसोली स्थानकातून विभागातील रहिवाशांसह ठाणे, मुंबई, कल्याण, आसनगाव व इतर ठिकाणांहून हजारो प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. तसेच ठाणे - बेलापूर मार्गाच्या बाजूला असलेल्या कंपन्यांमधील कामगारदेखील येथून ये- जा करतात. मात्र, या स्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारीदेखील केल्या जात आहेत.
-------------------------------------
या आहेत समस्या-
भुयारी मार्गात पाणीगळती
घणसोली रेल्वे स्थानकात असलेल्या भुयारी मार्गाच्या वरच्या बाजूस पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांना गळती लागल्याने भुयारी मार्गातदेखील पाणीगळती होत असून अपंग व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुलांना प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
------------------------
अपुऱ्या तिकीट खिडक्या-
घणसोली रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वे स्थानकात २ किंवा ३ तिकीट खिडक्या सुरू असतात. ठाणे- बेलापूर मार्गाच्या दिशेने असलेले तिकीट काऊंटर बंद असल्याने त्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील एकाच तिकीट खिडकीवर रांग लावावी लागते. यामुळे एका व्यक्तीला २०-३० मिनिटे तिकिटासाठी उभे राहावे लागत असून लोकल सुटत असल्याच्या तक्रारी प्रवाशांच्या आहेत.
------------------------------
फेरीवाल्यांचा विळखा -
रेल्वे स्थानकाच्या बाहेर व आतील बाजूस फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वडापावच्या गाड्या, चणे-फुटाणे, बॅग्स आणि इतर अनेक गोष्टींची विक्री रेल्वेस्थानकाबाहेर सुरू आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस लोकल पकडण्यासाठी धावणाऱ्या प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
---------------------------
रिक्षाचालकांची मनमानी -
रेल्वे स्थानकाबाहेर पूर्व व पश्चिमेस दोन्ही बाजूला स्थानक परिसरात रिक्षाचालकांचे थांबे आहेत; पण अनेकदा प्रवाशांकडून अवाजवी भाडेवसुली करून प्रवाशांची अडवणूक केली जाते. तसेच स्थानकाच्या बाहेर अनधिकृत वाहनेदेखील उभी केली जात असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे.
--------------------------------
स्थानकाबाहेर अपुरी वीजव्यवस्था -
स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जागा रिकामी असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गर्दुल्ल्यांचा वावर असतो. अपुऱ्या वीज व्यवस्थेचा फायदा घेऊन नशा करणाऱ्यांचा वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
----------------------------
कचऱ्याचे ढीग -
रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या झाडीझुडपांमध्ये काही लोकवस्ती असल्याने आणि काही फेरीवाले उरलेला कचरा या झुडपांमध्ये टाकतात. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा, गुटख्याची पाकिटे साचली आहेत. शिवाय रेल्वे स्थानकातून पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या गटारांची झाकणे पूर्णपणे तुटलेली असल्याने अपघाताचीदेखील शक्यता आहे.
----------------------------------------------------
घणसोली रेल्वे स्थानकातील प्रवास पूर्वीसारखा राहिलेला नसून विविध समस्यांना पार करून या स्थानकातून प्रवास करावा लागत आहे. स्थानकातील पाणीगळतीची समस्या सगळ्यात गंभीर असून सिडकोने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- संजय चौधरी, प्रवासी
------------------------------------
घणसोली रेल्वेस्थानकात असलेल्या समस्यांसंदर्भात सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता लवकरच त्यावर विविध उपाययोजना केल्या जातील.
- आर. ए. दुर्वे, स्टेशन प्रबंधक, घणसोली

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96649 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..