Navi mumbai : १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi mumbai
१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश

Navi mumbai : १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश

डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा यासाठी गेली कित्येक वर्षे ग्रामस्थ लढा देत होते. सहा महिन्यांपूर्वी अधिवेशनात गावांचा पालिकेत समावेश झाल्याची घोषणा करणारे तत्कालीन नगरविकासमंत्री मुख्यमंत्री झाल्याने ते आश्वासनाची पूर्तता करणार का, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यातच राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आणि १४ गावांतील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. सलग तीन वेळा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या ग्रामस्थांनी २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही तासांतच सरकारने १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाला मंजुरी देत नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासनाची अधिसूचना जारी केली आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळफाटा परिसरातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून १३ वर्षांपूर्वी वगळण्यात आली होती. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा विकास होत नसल्याने ही गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट करा, अशी मागणी २०१५ पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली होती. १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती त्यासाठी लढा देत होती. सरकारकडे वारंवार मागणी करूनदेखील ती मान्य होत नसल्याने विधान परिषद पदवीधर निवडणूक तसेच एप्रिल २०२० मध्ये १४ गावांतील वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारीवली या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होताच ग्रामस्थांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. कोरोना संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक डिसेंबर महिन्यात लागली असता तेव्हाही ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शिवसेना ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यास सज्ज होती; मात्र ग्रामस्थांचा विरोध, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा ग्रामस्थांना मिळणारा पाठिंबा पाहता शिवसेनेने नंतर आपला निर्णय मागे घेत बहिष्काराला पाठिंबा दिला होता.

मनसे आमदारांचा पाठपुरावामार्च २०२२ मध्ये पार पडलेल्या अधिवेशनात मनसे आमदार पाटील यांनी १४ गावांची लक्ष्‍यवेधी मांडली. लक्षवेधीला उत्तर देताना तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गावांचा पालिकेत समावेश केल्याची घोषणा केली. याला सहा महिने उलटले तरी त्याबाबत अध्यादेश न निघाल्याने गावांच्या समावेशाचे घोंगडे भिजत पडले होते. काही दिवसांपूर्वीच मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा अशी आठवण करून दिली होती. ग्रामस्थांनी वारंवार भेट घेऊनही त्यावर निर्णय घेण्यास मात्र चालढकल केली जात होती.

अवघ्‍या काही तासांत निर्णय

राज्यातील एक हजार ११६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सरपंचपदासाठी थेट निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जारी केला. यावर सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह समिती सदस्यांनी सोमवारी दुपारी तहसीलदारांची भेट घेत निवडणुकीवर १४ गावांचा बहिष्कार असल्‍याचे पत्र देत भूमिका स्पष्ट केली. त्यावर अवघ्या काही तासांतच सरकारने १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याविषयी शासन निर्णय जारी केला. नगरविकास विभागाकडून तशी अधिसूचना जारी करण्‍यात आली असून यावर ३० दिवसांत हरकती मागवण्यात आल्या आहेत.

तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांची सूचना निघाली असता समितीच्या वतीने एकमताने निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका घेण्यात आली; मात्र याबाबत अधिसूचना जारी झाल्‍याने गावांत आनंदाचे वातावरण आहे.
- लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96650 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..