मिठागर कामगारांची सिडकोकडून उपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठागर कामगारांची सिडकोकडून उपेक्षा
मिठागर कामगारांची सिडकोकडून उपेक्षा

मिठागर कामगारांची सिडकोकडून उपेक्षा

sakal_logo
By

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबई शहर वसवण्यासाठी सिडकोने १९८३-८४ सालात मिठागरांच्या जागा कवडीमोल भावाने संपादित केल्या होत्या. त्या वेळी सिडकोने प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाईसह भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आजतागायत या आश्वासनांची पूर्तता सिडकोने केली नसल्याने हक्काच्या रोजगारापासून वंचित झालेल्या मिठागर कामगारांच्या नशिबी उपेक्षितांचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
सिडकोने शहर निर्मितीसाठी स्थानिकांच्या हजारो हेक्टर जमिनी कवडीमोल भावात घेतल्या होत्या. यात करावे, दारावे, सारसोळे, नेरूळ, सानपाडा, जुहूगाव, तुर्भे, कोपरी गाव येथील मिठागरांचादेखील समावेश होता. या जमिनी घेताना प्रकल्पबाधितांना रोजगाराचे दिवास्वप्न दाखवले गेले होते. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांचे व्यवसाय नष्ट झाले आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण आखले होते. त्यामुळे शेती, मिठागरे, मासेमारी करणारे या पुनर्वसन धोरणाचे लाभार्थी ठरत होते. याच धोरणानुसार १९९० मध्ये सिडकोकडून मिठागर कामगारांना ४० चौरस मीटरचा भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले होते, पण अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने बाराशेहून अधिक महिलांवर उपेक्षितांचे जगण्याची वेळ आली होती.
----
भूमिहीन मिठागर कामगाराचा शिक्का
सिडकोने २८ हजार ७७९ हेक्टर जमिनी संपादित केल्या होत्या. त्यापैकी खासगी १६ हजार ५१२ हेक्टर, सरकारी नऊ हजार ५४७ हेक्टर; तर खाजान दोन हजार ७२० हेक्टर जमिनीचा समावेश आहे. सिडकोने बिगरप्रकल्पबधितांचे पुनर्वसन केले, पण येथील मिठागर कामगारांना मात्र भूमिहीन मिठागर कामगार अशी व्याख्या तयार करून न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे वयाच्या ७५ व्या वर्षीही मिठागर महिला कामगारांना नुकसानभरपाईसाठी मोर्चे-आंदोलने करण्याची वेळ आली होती.

कोट
सिडको व स्थानिक राजकीय पक्षाकडून कायम मिठागर कामगारांची दिशाभूल केली गेली. शासनाच्या अध्यादेशात मिठागर कामगारांना ४० चे भूखंड देण्यात यावे, असे नमूद आहे. असे असतानादेखील त्यांना आजही भूखंड वाटप करण्यात आलेले नाही. मिठागर कामगार वर्षानुवर्षे उपेक्षितच राहिला आहे.
- चंद्रकांत तांडेल, अध्यक्ष, आगरी कला व संस्था, नवी मुंबई
---
बहुतांश मिठागर महिला कामगारा आज हयात नसल्या तरी त्यांचे वारसदार आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत मोबदला मिळेल या आशेवर जगल्या, पण मृत्यूनंतरही त्यांची उपेक्षाच केली जात आहे.
- सुभाष म्हात्रे, भूमिपुत्र

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96671 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..